Sharmila Thackeray | X

नवी मुंबई मध्ये मागील काही दिवसांमध्ये तरूणींवर होत असलेल्या अत्याचार आणि खूनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याने पोलिसांना आता जहाल भूमिका घेत आपली दहशत दाखवण्याची गरज असल्याचं सांगत शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) बरसल्या आहेत. आज त्यांनी नवी मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेत शिष्टमंडळासोबत आपली नाराजी बोलून दाखवली आहे. "कायद्याचा धाक नसला की अशा गोष्टी होतात आणि म्हणूनच माझी पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील विनंती आहे की, गेली 10 वर्ष शक्ती कायदा (Shakti Act) पारित झालेला नाही, जो लवकरात लवकर करावा. " असं त्या म्हणाला आहेत. दरम्यान आज उरण मध्ये एकतर्फी प्रेमातून उरण मध्ये 22 वर्षीय मुलीचा खून झालेल्या कुटुंबियांकडेही जाऊन त्यांनी त्यांचे सांत्वन केले आहे.

27 जुलैला उरण मध्ये एका 22 वर्षीय मुलीचा तिच्यावर प्रेम करणार्‍या दाऊद शेख नामक मुलाने जीवघेणा हल्ला केला आहे. या तरूणीचा मृतदेह झुडूपामध्ये छिन्नविछिन्न अवस्थेमध्ये आढळला आहे. यामध्ये आरोपीला कर्नाटक मधून अटक झाली आहे. यापूर्वी घरगुती वादविवादाच्या मानसिक तणावात असलेल्या मुलीवर मंदिरातील 3 पुजार्‍यांनी अत्याचार करून तिची हत्या केल्याचं प्रकरण ही ताजं आहे. 'गुन्हे करणाऱ्या पुरुषांना धर्म नसतो. लव्ह जिहाद करणाऱ्या पुरुषाला मारायचं आणि मंदिरातील पुजाऱ्यांनी केलं म्हणून सोडायचं, असे नाही. दोन्ही घटनेतील आरोपी पुरुषांना कडक शासन झालं पाहीजे.' असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या आहेत.

शक्ती कायदा मंजूर करण्याची मागणी

दहा वर्षांपासून शक्ती कायदा मंजूर झालेला नाही. आमची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे की, तुम्ही एका वर्षात शक्ती कायदा मंजूर करा. त्याची अंमलबजावणी होते की नाही? याचीही तपासणी करा. अशा गुन्ह्यातील गुन्हेगारांना वरच्या न्यायालयात जाण्याची मुभा न देता तात्काळ शिक्षा करण्याची मागणी शर्मिला ठाकरेंनी केली आहे.