Sanjay Raut On Sharad Pawar Resignation: शरद पवारांचे नेतृत्व आवश्यक, त्यांना पर्याय नाही; राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांचा राजीनामा फेटाळल्यानंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया, Watch Video
Sanjay Raut | (PC - ANI)

Sanjay Raut On Sharad Pawar Resignation: शिवसेना (यूबीटी) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा राजीनामा फेटाळण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. राष्ट्रवादीच्या नेत्याला पर्याय नसून महाराष्ट्र राजकीय क्षेत्रात जे घडत आहे त्या दृष्टीने त्यांचे नेतृत्व महत्त्वाचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. हे अपेक्षित होते. पवार साहेबांशिवाय पर्याय नाही. NCP समितीचा निर्णय योग्य आहे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

पवार हे सर्वात आदरणीय आणि राष्ट्रीय स्तरावर स्वीकारलेले नेते आहेत. त्यांनी त्यांच्या पदावर कायम राहावे, अशी देशातील सर्व विरोधी पक्षांची इच्छा आहे. देशातील सध्याचे राजकीय वातावरण लक्षात घेता विरोधी ऐक्यासाठी आणि देशासाठी त्यांचे नेतृत्व आवश्यक आहे, अशी भावना यावेळी संजय राऊत यांनी व्यक्त केली. (हेही वाचा - NCP Worker Tried To Commit Suicide: राष्ट्रवादीचे कार्यकर्ते Ajit jha यांचा पक्षाच्या मुंबई कार्यालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न, Watch Video)

शरद पवार यांनी 2 मे रोजी पक्षप्रमुख पदाचा राजीनामा जाहीर केला. त्यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशन समारंभात त्यांनी निवृत्तीची घोषणा केली. दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख समितीने शरद पवार यांचा राजीनामा एकमताने फेटाळला. मुंबईतील बॅलार्ड पिअर येथील त्यांच्या पक्ष कार्यालयात राष्ट्रवादी नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत शरद पवार यांचा राजीनामा एकमताने नामंजूर करण्यात आला.

बैठकीनंतर, पक्षाचे उपाध्यक्ष, प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, पॅनेलने एकमताने जाहीर केले की त्यांनी राजीनामा नाकारण्याचा निर्णय घेतला आहे. समितीने शरद पवार यांनी प्रमुख म्हणून राहण्याचा प्रस्ताव पास केला आहे. राष्ट्रवादीच्या या निर्णयाला सहमती दर्शवताना राऊत यांनी पुनरुच्चार केला की, सत्ताधारी भारतीय जनता पक्ष विविध प्रकारचे दबावाचे डावपेच वापरून सर्व विरोधी पक्षांना नष्ट करण्याचा आणि त्यात विलीन होण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करत आहे.

प्रथम भाजपने शिवसेना फोडली. आता केंद्रीय तपास यंत्रणांच्या भीतीने राष्ट्रवादीलाही असेच टार्गेट केले जात आहे. लोकशाहीत हे चालणार नाही, असंही राऊत यांनी यावेळी म्हटलं आहे.