Sharad Pawar On Narayan Rane: नारायण राणे यांच्या आक्षेपार्ह्य वक्तव्यावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया
NCP Chief Sharad Pawar with Maharashtra CM Uddhav Thackeray (Photo Credits: IANS)

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी काल (23 ऑगस्ट) महाड येथे जन आशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्र्यांविरोधात केलेल्या आक्षेपार्ह्य वक्तव्याप्रकरणी आता सर्वच स्तरातून टीकेची झोड उठली आहे. नारायण राणेंच्या वक्ताव्यानंतर शिवसेनेने (Shiv Sena) अतिशय आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत आहे. ज्यामुळे राज्यात नारायण राणे विरुद्ध शिवसेना असे वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान, राणे प्रकरणांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना विचारले असता 'मी त्याला फारसे महत्व देत नाही', अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

संपुर्ण महाराष्ट्रात नारायण राणे यांच्या मुख्यमंत्र्यांवरील वक्तव्यामुळे वाद शिगेला पोहचला आहे. याबाबतची प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारली. त्यावर शरद पवार यांनी “मला काही बोलायचे नाही. मी त्याला फारसे महत्व देत नाही. त्यांच्या पद्धतीने त्यांच्या संस्काराप्रमाणे बोलतात.” अशा मोजक्याच शब्दात शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे देखील वाचा- Shiv Sena Vs BJP: शिवसैनिक करत असलेली तोडफोड ही सरकार स्पॉन्सर्ड- देवेंद्र फडणवीस

नारायण राणे काय म्हणाले?

देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनी मंत्रालयात भाषण करताना उद्धव ठाकरे अमृत महोत्सव हा शब्द विसरले होते. याच मुद्द्यावरुन नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर खालच्या पातळीत टीका केली आहे. नारायण राणे म्हणाले की, "देशाला स्वातंत्र्य मिळून कित्येक वर्षे उलटली. हिरक मोहत्सव काय? जर त्या ठिकाणी मी असतो तर, कानाखाली चढवली असते. देशाच्या स्वातंत्र्य दिनाबाबत तुम्हाला माहिती नसावी? सांगा मला किती चीड येणारी गोष्ट आहे. सरकार कोण चालवत आहे? हे कळतच नाही, ड्रायव्हरच नाही. राष्ट्रवादी मात्र सत्ता उपभोगते आहे.” असे नारायण राणे यांनी म्हटले.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. नारायण राणे यांचा जामीन अर्ज रत्नागिरी सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. त्यानंतर राणे यांनी मुंबई उच्च न्यायालात धाव घेतली. परंतु, मुंबई उच्च न्यायालयानेही राणे यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला.