Sharad Pawar | (Photo Credits: Twitter/ANI)

शिवसेनेचे नाव आणि चिन्हाबाबतच्या वादात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांचे महत्वाचे वक्तव्य समोर आले आहे. पवार यांनी आपल्या वक्तव्यातून निवडणूक आयोगावर (Election Commission) निशाणा साधला आहे. सरकारला जे हवे होते ते निवडणूक आयोगाने केले. आयोगाचा गैरवापर झाला आहे. निवडणूक आयोगाचा असा निर्णय आपण कधीच पाहिला नाही, असे शरद पवार म्हणाले आहेत.

तत्पूर्वी, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता देण्याच्या निवडणूक आयोगाच्या आदेशाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला.

शरद पवार म्हणाले, ‘निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी एक निर्णय दिला. एखाद्या संस्थेचा गैरवापर कसा होऊ शकतो, याचे हे उदाहरण आहे. निवडणूक आयोगाचा असा निर्णय आम्ही कधीच पाहिला नाही. शिवसेनेची जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्यावर सोपवली जाईल, असे बाळासाहेब ठाकरे यांनी शेवटच्या काळात सांगितले होते. परंतु कोणीतरी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आणि निवडणूक आयोगाने निकाल दिला. आयोगाने ज्यांनी हा पक्ष काढला त्यांच्यापासून पक्षाचे नाव व चिन्ह हिरावून दुसऱ्याच कोणाला तरी दिले.’

‘आज निवडणूक आयोग व इतर संस्था सत्ताधारी सरकारला हवे तसे निर्णय देत आहेत. आज ज्या प्रकारे या संघटना मोदींच्या नेतृत्वाखाली देशात कार्यरत आहे, त्यावरून त्यांना वाटते की ते आपल्या हातात सत्ता ठेवतील. आताचा आयोगाचा निर्णय हा राजकीय पक्षांवर मोठा हल्ला आहे. एक विचारधारा आणि पक्ष देशातील बंधुभाव नष्ट करत आहेत. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना देशाच्या संस्थेवर असा हल्ला झाला नव्हता. नरेंद्र मोदी यांचे सरकार देशातील संस्थांवर हल्ला करत आहे आणि राजकीय पक्षांना काम करू देत नाही.’ (हेही वाचा: Watch: ‘राज्यात राष्ट्रपती राजवट का व कोणाच्या सांगण्यावरून लागली याचा खुलासा शरद पवार यांनी करावा’- Devendra Fadnavis)

निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात शुक्रवारी शिंदे गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली होती. शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्हही त्यांना देण्यात आले. आयोगाच्या या निर्णयाविरोधात शिवसेनेने (उद्धव गट) सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. बुधवारी म्हणजेच आज, सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला.