Sharad Pawar On Foxconn: फॉक्सकॉन (Foxconn) प्रकल्प महाराष्ट्रतच येणार होता. तो आता गुजरातला गेला. विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला प्रकल्प राज्याबाहेर जाणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. जे झालं ते झालं. आता या पुढे तरी राज्य सरकारने काळजी घ्यावी. यापुढ राज्याचे दृष्टीने महतत्त्वाचे असलेले प्रकल्प राज्याबाहेर जाऊ देऊ नये. पुर्वी राज्याच्या नेतृत्वामुळे अनेक महत्त्वाचे प्रकल्प महाराष्ट्रात येत असत. आता राज्याची यंत्रणा थंड पडली आहे का? असा प्रश्न मनात उत्पन्न होतो, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी खंत व्यक्त केली आहे. राज्यात प्रलल्पावरुन राजकारण होत आहे. अशा पद्धतीने राजकारण होणं हे दुर्दैवी आहे. असं घडायला नको होतं, असेही शरद पवार म्हणाले.
फॉक्सकॉन सारखा प्रकल्प राज्याबाहेर गेला. आता सरकारमधील मंत्री पाठिमागील सरकारवर खापर फोडत आहेत, यावर विचारले असता शरद पवार म्हणाले, आताच्या सरकारमध्ये असलेले बहुतांश मंत्री हे मागच्या सरकारमध्ये मंत्री होते. त्यामुळे सर्वच निर्णय प्रक्रियेमध्ये ते होते. त्यामुळे आता जो प्रकल्प गेला त्यावर चर्चा करण्यापेक्षा आता नवीन प्रकल्प कसे येतील यावर लक्ष केंद्रीत करावे. राज्यात नवे काही करता येईल काय? याबाबतही राज्याच्या नेतृत्वाने विचार करावा, अशी भावना शरद पवार यांनी व्यक्त केली. (हेही वाचा, NCP President: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी Sharad Pawar यांची 4 वर्षांसाठी एकमताने फेरनिवड)
भाजपने महाराष्ट्रात मिशन 45 ठेवले आहे. त्यामुळे भाजपने राज्यातील विविध लोकसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रीत केले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामण या बारामतीचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यावरुन विचारले असता शरद पवार म्हणाले, चांगले आहे. एखादा केंद्रीय मंत्री बारामतीला येणे ही आनंदाची बाब आहे. राज्यातील आणि त्यातही बारामतीतील जनतेच्या भावना समजून घेण्यासाठी त्या बारामतीला येत असतील. बारामतीच्या लोकांना सीतारमण यांची भाषा कळेल, असा टोलाही शरद पवार यांनी लगावला.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणपती दर्शनावरुनही शरद पवार यांनी टोला लगावला आहे. राज्यातील सत्तारानंतर कामांना गती मिळाली आहे का? असा प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले. मला बाकी कशात गती मिळाली आहे असे वाटत नाही. पण, एक मात्र नक्कीआहे. राज्याचे नेतृत्व मोठ्या गतीने फिरत आहे. राज्य समजून घेण्यासाठी त्यानी वाढवलेली गती चांगली आहे, असे शरद पवार म्हणाले.