Sharad Pawar on Ram Mandir Inauguration: शरद पवार अयोध्येला जाणार! मात्र, राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण नाही
Sharad Pawar | (Photo Credits: Facebook)

अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिर सोहळ्याचे (Ram Mandir Inauguration) निमंत्रण आले नाही. मात्र, आपण अयोध्येला जाणार आहोत. अर्थात, येत्या 22 जानेवारीला नाही. पण भविष्यात केव्हातरी नक्की जाणार, असे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय पातळीवरील विरोधकांच्या इंडीया आघाडीची (India Alliance) एक बैठक ऑनलाईन प्रणालीद्वारे पार पडली. या बैठकीत सहभागी झाल्यानंतर शरद पवार यांनी पुणे जिल्ह्यातील जुन्नर (Sharad Pawar at Junnar) येथील शेतकरी मेळाव्यास हजेरी लावली. जुन्नर येथील विघ्नहर साखर कारखान्यामध्ये आसवनी आणि इथेनॉल प्रकल्पाच्य विस्तारीकर प्रकल्पाचे लोकार्पणही त्यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. त्यांनी या वेळी विविध मुद्द्यांवरुन भाष्य केले. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान त्यांनी केलेल्या घराणेशीहीवरील टीकेवरुनही जोरदार प्रत्युत्तर दिले.

पंतप्रधनांनी घराणेशाहीपेक्षा मुलभूत प्रश्नांवर बोलावे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराणेशाहीवर वारंवार बोलणे योग्य नाही. ते जर म्हणतात घराणेशाही आहे तर आज डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, वकिलाचा वकील, शेतकऱ्याचा मुलगा शेतकरी होतो, असे असेल तर मग राजकारणी व्यक्तीचा मुलगा जर राजकारणात आला तर? त्याला घराणेशाही कसे म्हणणार? त्यांनी घराणेशाहीसारख्या भलत्याच मुद्द्यांवर बोलण्याेक्षा जनतेच्या जीवनमरणाशी संबंधित आणि मुलभूत प्रश्नांवर त्यांनी भाष्य करायला हवे, असेही शरद पवार म्हणाले. (हेही वाचा, Uddhav Thackeray On Dynastic Politics: घरंदाज माणसानेच घराणेशाही विषयावर बोलावे; उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदी यांना टोला)

'श्रीराम सर्वांचे आहेत'

दरम्यान, येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्या येथे श्री रामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा होत आहे. त्याचा सोहळाही असल्याचे समजते. आम्हाला त्या सोहळ्याचे निमंत्रण नाही. पण, हरकत नाही. निमंत्रण नसले तरी आपण अयोध्येला जाणार आहोत. पण, 22 जानेवारीला नव्हे तर त्यानंतर कधीतरी अयोध्येला नक्की जाईन. श्री राम कोणा एकट्याचे नव्हे सर्वांचे आहेत, असे पवार म्हणाले. सोहळ्याच्या नावाखाली विमानाची तिकीटे प्रचंड महागली आहेत. दहा हजार रुपयांचे तिकीट चक्क 40,000 रुपयांवर पोहोचल्याचे आम्ही ऐकतो. शंकराचार्यही या सहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे समजते आहे. अद्यापही अयोध्येतील राम मंदिर बांधकाम पूर्ण झाले नाही. तरीसुद्धा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होते आहे. त्यामुळे मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आपण अयोध्येला जाऊ, असे शंकराचार्यांनी म्हटल्याचे पुढे आल्याचेही शरद पवार म्हणाले. (हेही वाचा, Ajit Pawar On Sharad Pawar Retirement: 'काही लोक 84 व्या वर्षीही पद सोडायला तयार नाहीत': अजित पवार यांची ठाण्यातील कार्यक्रमात काका शरद पवार यांच्या निवृत्तीवर बोचरी टीका)

'साखर उद्योगाने वीज, इथेनॉलही निर्मिती करावी'

दरम्यान, साखरकारखान्यांनी केवळ साखर उत्पादनात अडकू नये. त्यांनी इतर उद्योगांकडेही आपला मोर्चा वळवायला हवे. साखरेसबतच कारखान्यांतून वीज आणि इथेनॉल यांच्यासारखीही निर्मिती व्हायला हवी. त्यासाठी कारखान्यातील मशीनमध्ये सुधारणा करण्यात यावी ज्यामुळे साखरेचा खर्च कमी होईल आणि उरलेला पैसा शेतकऱ्यांना वितरीत करण्यात येईल, असे सूत्र राबवायला हवे, असेही शरद पवार म्हणाले.