शरद पवार पुणे दौरा रद्द करुन अजित पवार यांची समजूत काढण्यासाठी मुंबईला रवाना
Sharad Pawar, Ajit Pawar | (Photo Credits: Facebook)

शरद पवार (Sharad Pawar) हे अजित पवार (Ajit Pawar) यांची समजूत काढण्यासाठी मुंबईला निघाले असल्याचे समजते. अजित पवार यांनी आज (शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019) आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. या पार्श्वभूमिवर शरद पवार यांनी पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. दरम्यान, पुणे येथील पत्रकार परिषद आटोपताच शरद पवार हे मुंबईला निघाले असल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. जिल्ह्यात आलेल्या पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी शरद पवार हे पुणे दौऱ्यावर होते. त्यांचा नियोजित कार्यक्रमही ठरला होता. मात्र, राजीनाम्याच्या वृत्ताने एकच खळबळ उडाल्याने ते अजित पवार यांची भेट घेणार असल्याचे समजते. प्राप्त माहितीनुसार, अजित पवार हे सध्या आपल्या कुटुंबासह मुंबई येथे आहेत.

प्राप्त माहितीनुसार, हरीभाऊ बागडे यांनी अजित पवार यांचा राजीनामा सोपवला आहे. अजित पवार यांच्या राजीनाम्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. या राजीनाम्याचे राजकीय वर्तुळात विविध अर्थ काढले जात आहेत. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. विद्यमान विधानसभेला अवघा एक महिन्यांचा कालावधी बाकी राहीला असताना अजित पवार यांनी अचानक दिलेला राजीनामा हा अनेकांसाठी भूवया उंचावणारा ठरला आहे. महत्त्वाचे असे की, अजीत पवार यांनी नेमका कोणत्या कारणासाठी राजीनामा दिला? या प्रश्नाचे उत्तर मात्र अद्याप समजू शकले नाही.

दरम्यान, आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले की, अजित पवार यांच्या राजीनाम्याबाबत मला कल्पना नव्हती. राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याशी माझा संपर्क होऊ शकला नाही. पण, मला त्यांच्या चिरंजीवाकडून काही माहिती समजली त्यावरुन असे दिसते की, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात माझे नाव आले त्यामुळे ते उद्विग्न झाले असावेत. सध्या राजकारणाचा स्तर प्रचंड घसरला आहे. त्यामुळे आपण राजकारणातून बाजूला होऊन शेती किंवा इतर काही उद्योग केलेला बरा, असा वडीलकीचा सल्लाही अजित पवार यांनी त्यांच्या चिरंजीवाला दिला, असे शरद पवार यांनी या वेळी सांगितले. (हेही वाचा, अजित पवार राजकारण सोडून करणार शेती, उद्योग?)

शरद पवार यांच्या या विधानामुळे अजित पवार हे विद्यमान राजकीय स्थितीबाबत खरोखरच इतके नाराज आहेत का? ते तितके नाराज असतील तर ते खरोखरच राजकारणातून बाहेर पडणार का? यांसारख्या अनेक प्रश्न सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चिले जात आहेत.