Sharad Pawar | (Photo Credits: Facebook)

कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास केंद्र सरकारने राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (National Investigation Agency) सोपवला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे. 'कोरेगाव भीमा प्रकरणातील सत्य बाहेर येऊ नये तसेच खऱ्या गुन्हेगारांना संरक्षण मिळावे आणि ज्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, त्यांना कायमस्वरूपी तुरुंगात डांबण्याच्या उद्देशाने एनआयएकडे तपास सोपविण्यात आला.' तसेच हा अत्यंत गंभीर प्रकार असल्याची खोचक प्रतिक्रियाही पवार यांनी यावेळी दिली.

कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास एसआयटी मार्फत करण्यात यावा, अशी मागणी शरद पवार यांनी केली होती. मात्र, मोदी सरकारने हे प्रकरण एनआयएकडे वर्ग केले आहे. कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास एनआयएने आपल्या हाती घेतल्यामुळे महाराष्ट्र सरकार आणि मोदी सरकार यांच्यात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. (वाचा - कोरेगाव-भीमा प्रकरण: केंद्र सरकारच्या निर्णयावर राज्य गृहमंत्री अनिल देशमुख संतापले; म्हणाले...)

वंचित बहुजन पक्षाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही याप्रकरणावरून भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. मागच्या सरकारचा खोटेपणा बाहेर येऊ नये आणि तो लपवण्यासाठी केंद्र सरकारने तपास स्वत:कडे वळवला आहे. राज्य सरकारने आक्षेप घ्यावा अशी विनंती सरकारला करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.