Sharad Pawar | (Photo Credits: Facebook)

Sharad Pawar Nashik Yeola Sabha: नाशिक (Nashik) जिल्ह्याला सुरुवातीपासूनच मोठे महत्त्व आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेसचे अधिवेशनही नाशिकला झाले होते. त्यामुळे महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात नाशिक येथून केल्याचे सांगत शरद पवार (Sharad Pawar) यांनी विविध विषयांवर भाष्य केले. ते आज येवला येथे सभा घेत आहेत. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. छगन भुजबळ शिवसेनेतून बाहेर पडल्यानंर नाशिकची निवड करण्याचा सल्ला आपणच दिला होता, असे सांगतानाच प्रफुल्ल पटेल यांना पराभूत होऊनही केंद्रात 10 वर्षे मंत्रिपद दिले. सुप्रिया सुळे निवडणुकीतून थेट निवडून आल्या असताना त्यांना डावलून पटेलांना मंत्रिपद देणे हे सुळे यांच्यावर अन्याय होता, अशी खंत शरद पवार यांनी या वेळी व्यक्त केली. येवला येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शरद पवार यांची जाहीर सभा होत आहे. तत्पूर्वी पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी करत भाजपसोबत हातमिळवणी केली. थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. त्यानंतर शरद पवार अत्यंत आव्हानात्मक अशा स्थिती बाहेर पडले आहेत. ते महाराष्ट्राचा दौरा करुन नागरिकांची भूमिका जाणून घेत आहे. दरम्यान, या दौऱ्यात त्यांच्यावर होणारी टीका टिप्पणी, आरोपांना उत्तर देत आहेत. अजित पवार यांनी शरद पवार यांना निवृत्तीचा सल्ला दिला होता. याबाबत विचारले असता, राजकारणात निवृत्तीला वय नसते. तुम्ही तुमची प्रकृतीचांगली ठेवली तर मनाला वाटेल तेव्हा राजकारणात काम करु शकता. मोरारजी देसाई वयाच्या 84 व्या वर्षीही पंतप्रधान म्हणून काम करत होते. मंत्रिमंडळात आजही 70 पेक्षा अधिक वय असलेले लोक सक्रीय आहेत. मला त्याबाबत काही म्हणायचे नाही. मला फक्त इतकेच सांगायचे आहे. 'मै टायर्ड नहीं, रिटायर्ड नहीं.. मै फायर हूँ..'. शरद पावर यांनी माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. (हेही वाचा, Sharad Pawar at Yeola: शरद पवार यांची येवला येथे सभा, छगन भुजबळ नाशिक दौऱ्यावर; घ्या जाणून)

ट्विट

मी राज्यभर दौरा करणार आहे. रस्त्याने येताना ओळखीचे चेहरे पाहून माझा आत्मविश्वास आणखी वाढला. जे लोक आले नाहीत त्यांचा विचार वेगळा आहे, हेसुद्धा आपल्या लक्षात आल्याचे पवार यांनी सांगितले. ठिक आहे. लोकशाही आहे. प्रत्येकाला आपापला स्वतंत्र विचार करण्याचा अधिकार आहे. त्यांच्या मताचेही स्वागत आहे, असे म्हणत शरद पवार यांनी आपण राजकारणात कोणालाही शत्रू मानत नसल्याचे सांगितले. तसेच, राजकारणात मतभिन्नता असते. पण म्हणून त्याला लगेच शत्रू मानायचे नसते, असेही पावर या वेळी म्हणाले.

दरम्यान, येवला येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शरद पवार यांची जाहीर सभेत शरद पवार कोणावर निशाणा साधतात याबाबत उत्सुकता आहे. केवळ राष्ट्रवादीच नव्हे तर अजित पवार गटासह राज्यातील सर्वच पक्षांना पवारांच्या भाषणाबाबत उत्सुकता आहे.