Elgar Parishad Pune | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Elgar Parishad 2021: एल्गार परिषद ( Elgar Parishad) घेण्यासाठी पुणे (Pune) पोलिसांनी अखेर परवानगी दिली आहे. त्यानुसार पुणे येथील गणेश कला क्रिडा रंगमंच (Ganesh Kala Krida Manch Swargate) येथे आज (30 जानेवारी 2021) ही परिषद पार पडत आहे. निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील (, BG Kolse Patil) यांनी ही परिषद आयोजित केली आहे. निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील यांनी स्वारगेट पोलिसांकडे (Swargate Police) ही परिषद घेण्यासाठी परवानगी मागितली होती. परंतू, तीन वर्षांपूर्वी एल्गार परिषदेनंतर भीमा कोरेगाव येथे घडलेली घटना आणि यंदाच्या वर्षी राज्यावर असलेले कोरोना व्हायरस संकट या पार्श्वभूमीवर पोलिसांनी परवानगी नाकारली होती.

स्वारगेट पोलिसांनी एल्गार परिषद घेण्यासाठी परवानगी नाकारल्यानंतर निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील चांगलेच आक्रमक झाले होते. पोलिसांनी जर एल्गार परिषदेला परवानगी नाकारली तर आपण रस्त्यावर येऊन जेलभरो आंदोलन करु, असा इशारा कोळसे पाटील यांनी दिला होता. कोळसे पाटील यांनी इशारा देऊनही काही काळ पोलिसांनी परवानगी नाकारली होती. परंतू, अखेर पोलिसांनी एल्गार परिषदेसाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे ही परिषद घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (हेही वाचा, Shaniwarwada Elgar Parishad Pune: एल्गार परिषद भरवण्यासाठी परवानगी द्या; निवृत्त न्यायाधीश बी जी कोळसे पाटील यांची पुणे पोलिसांकडे अर्ज)

दरम्यान, राज्यातील कोरोना व्हायरस संकट, राजधानी दिल्ली येथे झालेला स्फोट, त्यानंतर मुंबईसह राज्यभरता महत्त्वाच्या शहरांमध्ये जारी केलेला अतिदक्षतेचा इशारा तसेच, भीमा कोरेगावची घटना या सर्व पार्श्वभूमीवर ही परिषद पार पडत असलेल्या ठिकाणी पुणे पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. राज्य सरकारने कोरोना काळात कार्यक्रम घेण्यासाठी लागू केलेल्या अटींचे पालनही एल्गार परिषदेवेळी करणे बंधनकारक असणार आहे.

प्राप्त माहितीनुसार, पुणे पोलिसांनी स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा रंगमंच परिसरात चोख बंदोबस्त ठेवला आहे. स्वारगेट टीळक रस्ता परिसरात वाहतूक नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी वाहतूक शाखेचे अतिरिक्त पोलीस या ठिकाणी तैनात आहेत. शहरातील संवेदनशील आणि अतीसंवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणीही पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. या शिवाय गुन्हे शाखेसह विशेष शाखेची पथके बंदोबस्तासाठी तैनात आहेत. कार्यक्रमस्थळी केवळ 200 लोकांनाच उपस्थित राहण्यास परवानगी असणार आहे.