मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक; महाराष्ट्रात नवे राजकीय समिकरणाची चर्चा
Devendra Fadnavis, Raj Thackeray | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

महाराष्ट्र नवनिर्माण सेना ( MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री, विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात एक गुप्त बैठक पार पडल्याची माहिती समोर येत आहे. ही बैठक मंगळवारी (7 जानेवारी 2020) दुपारी 3.30 च्या दरम्यान पार पडलेल्या या बैठकीत साधारण दोन्ही नेत्यांमध्ये साधारण 1 तास बैठक पार पडल्याचे समजते. या भेटीचा तपशील अद्याप बाहेर आला नाही. मात्र, मनसेच्या झेंड्याचा रंग बदलण्यात येणार असल्याची चर्चा आणि दोन्ही नेत्यांच्या प्रमुख नेत्यांमध्ये झालेली ही भेट पाहून महाराष्ट्रातील नव्या मैत्रीपर्वाची नांदी तर नव्हे ना? अशी प्रश्नार्थक चर्चा रंगली आहे.

येत्या 23 जानेवारीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्यात होणाऱ्या राज ठाकरे यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे 23 तारखेच्या मेळाव्यात राज ठाकरे या भेटीतील तपशीलव उघड करणार का? याबाबत उत्सुकता आहे.

दरम्यान, युतीत निवडणूक लढूनही मुख्यमंत्री पदाची भागिदारी केवळ स्वत:कडेच ठेवण्याच्या भाजपच्या भूमिकेमुळे जुना मित्रपक्ष शिवसेना दुरावला गेला. त्यानंतर शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडत राष्ट्रवादी काँग्रेस, आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षासोबत नवे मैत्रीपर्व सुरु केले. त्यामुळे राज्याच्या राजकारणात बलाढ्य मित्राविना एकट्या पडलेल्या भाजपला नव्या भीडूची गरज आहे. त्यामुळे भाजप मनसेच्या रुपात ही कमतरता भडून काढण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, मुंबई: 'फ्री कश्मीर' पोस्टरवरुन जयंत पाटील, देवेंद्र फडणवीस यांच्यात ट्विटवॉर)

दरम्यान, शिवसेना-भाजप युती ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर झाली होती. मात्र, आता शिवसेनाच भाजपपासून दुरावल्याने भाजपला नवा मित्र हवा आहे. मनसेचा अलिकडील इतिहास पाहता मनसेने भाजप खास करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या विरोधी भूमिका घेतली आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांना एकत्र यायचे तर पुन्हा एकदा नवा मुद्दा हाती घ्यावा लागणार आहे. यात मनसेने जर हिंदुत्त्वाचा पुरस्कार केला तर ही युती आकाराला येण्याची शक्याता कैक पटींनी वाढू शकते. ही सर्व पार्श्वभूमी विचारात घेता दोन्ही नेत्यांची भेट कमालीची महत्त्वाची मानली जात आहे.