महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यांत सरकारकडून कोविड 19 नियमावली शिथिल करण्यात आल्यानंतर आता शाळा, कॉलेज सुरू करण्याला देखील तयारी झाली आहे. पुण्यात शहरी भागात 16 ऑगस्ट पासून 8वी ते 12वीचे वर्ग तर ग्रामीण भागात 5वी ते 8वीचे वर्ग सुरू करण्याच्या तयारीला सुरूवात झाली आहे. मागील दीड-दोन वर्ष कोरोना संकटामुळे अनेक ठिकाणी शाळा बंदच ठेवण्यात आल्या होत्या. पुण्यात पॉझिटीव्हिटी रेट आटोक्यात असल्याने ग्रामीण भागात 8वी ते 12वीचे वर्ग मागील महिन्याभरापासून सुरळीत ठेवण्यात प्रशासनाला यश आलं आहे. पुणे अनलॉक! महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती; कशा-कशातून मिळाली सूट? घ्या जाणून.
टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट्सनुसार, पुण्यात शाळा सुरू करण्याबाबत पालकांमध्येही सकारात्मक भावना आहे. मुख्याध्यापिका शुभा काळे यांनी एका अहवालात 60% पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी उत्सुक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आम्ही उर्वरित 40% पालक देखील नियमित शाळा सुरू झाल्याचं पाहून पाल्यांना शाळेत पाठवतील अशी आशा करतो. त्यासाठी सध्या आम्ही तयारी सुरू केलेली आहे.
शाळांकडून ऑफलाईन क्लास साठी नवं वेळापत्रक सुरू करण्याची तयारी आहे. सध्या प्रॅक्टिकल्स आणि ट्रेनिंग सेशन सुरू करण्याकडे शाळा, ज्युनियर कॉलेजचा कल आहे. मागील दीड- दोन वर्ष शाळा ऑनलाईन स्वरूपात सुरू आहे. यामुळे शिक्षण व्यवस्थेत बदल झाले असून अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी उपलब्ध साधनं नसल्याने शिक्षणापासून दूर रहावे लागत आहे. अनेक लाजर्या स्वभावाच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लास मध्ये मनमोकळं बोलता येत नसल्याने त्यांच्या मनातील प्रश्न तसेच राहिले आहेत परिणामी त्यांचे शैक्षणिक नुकसान देखील झाले आहे.