
Pune Unlock From Tomorrow: महाराष्ट्रातील (Maharashtra) कोरोना रुग्णांच्या संख्येतील घट पाहता राज्य सरकारने गेल्या आठवड्यात अनलॉकबाबतची नवी नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, जवळपास 25 जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले होते. मात्र, ज्या भागात रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे, त्या ठिकाणी कोरोनाचे निर्बंध कायम ठेवण्यात आले होते. या यादीत पुणे जिल्ह्याचाही समावेश होता. यामुळे पुण्यातील व्यापारी वर्गांनी आक्रमक भूमिका घेतली होती. अखेर आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बैठक घेऊन पुण्यातील निर्बंध शिथिल करण्याची घोषणा केली आहे.
पुणे उद्यापासून अनलॉक करण्यात आले आहे. तसेच विविध निर्बंधातून सूटही देण्यात आली आहे. पुण्यात उद्यापासून सर्व दुकाने सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. हॉटेल रात्री 10 पर्यंत सुरु ठेवता येणार आहे. शनिवार-रविवार सर्व सेवांना दुपारी 4 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. तसेच मॉल रात्री 8 वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार असून लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना मॉलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. काही दिवसांपूर्वी वेळ वाढवून मिळावी, यासाठी पुण्यातील व्यापारी आक्रमक झाले होते. पण आता वेळ वाढवून मिळाल्याने व्यापाऱ्यांसह हॉटेलचालक आणि दुकानदारांना दिलासा मिळाला आहे. हे देखील वाचा- Uddhav Thackeray Address to State Today: सर्वसामन्यांनाही मुंबई लोकलमधून प्रवास करता येणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष
मुरलीधर मोहोळ यांचे ट्वीट-
मागणी मान्य, उद्यापासून पुणे अनलॉक !
- सर्व दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरु राहणार
- हॉटेल रात्री १० पर्यंत सुरु ठेवता येणार
- शनिवार-रविवार सर्व सेवांना दुपारी ४ पर्यंत परवानगी
- मॉल रात्री ८ पर्यंत सुरु ठेवता येणार, लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) August 8, 2021
नागरिकांची गरज लक्षात घेऊन निर्बंध हटविले असले तरी कोरोनाचे संकट अजून पूर्णपणे दूर झालेले नाही याची नागरिकांनी नोंद घ्यावी. तसेच कोरोनाचे सर्व नियम पाळूनच नागरिकांनी बाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.