PMC: पुण्यात शाळेची घंटा वाजणार; शहरातील इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग 1 फुब्रुवारीपासून सुरू होणार
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: ANI)

कोरोनाच्या महामारीमुळे (Coronavirus Pandemic) शाळा गेल्या अनेक महिन्यांपासून बंदच आहेत. सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग आटोक्यात आला आहे. यामुळे राज्यात टप्याटप्याने अनेक आस्थापना, कार्यालये, संस्था, प्रवासी वाहतूक सुरु करण्यात येत आहे. मात्र, ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची शाळा कधी सुरु होणार? असा प्रश्न पालक वर्गांसमोर उभा राहिला आहे. यातच पुणे (Pune) जिल्ह्यात इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग 1 फेब्रुवारीपासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पुणे महापालिका (PMC) अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल (Rubel Agarwal) यांनी ही माहिती दिली आहे.

महत्वाचे म्हणजे, पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व प्रकारच्या इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतची शाळा कोरोना मार्गदर्शक सूचना आणि अटींचे पालन करून सुरु करण्यात परवानगी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची लेखी सहमती शाळा प्रमुखांनी प्राप्त करुन पर्यवेक्षक प्राथमिक शिक्षण विभागाला सादर करणे बंधनकारक आहे. याशिवाय, वर्गात आणि स्टाफरुममधील बैठक व्यवस्था सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून ठेवावी लागणार आहे. दरम्यान, शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोव्हिड19 साठीची आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक असणार आहे. हे देखील वाचा- Maharashtra Board SSC HSC Exam Dates 2021: 12 वी ची परीक्षा 23 एप्रिल, 10 वी परीक्षा 29 एप्रिल पासून सुरू होणार; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीने गुरुवारी (21 जानेवारी) केंद्रीय बोर्डाच्या सीबीएसई दहा शाळा करण्याचा निर्णय घेतला होता. याचबरोबर आता महाराष्ट्र बोर्डाच्या एसएससी 21 शाळा दहावीपर्यंत सुरु करण्याचा निर्णयावर शिक्कामोर्तब केला आहे.

महाराष्ट्रात आज 2 हजार 779 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 3 हजार 419 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 19 लाख 06 हजार 827 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 44 हजार 926 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.17% झाले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.