Representational Image (Photo Credits: Wikimedia Commons)

कोरोना वायरस संकटामुळे यंदा मार्च महिन्यापासून बंद असलेल्या शाळा अद्याप उघडलेल्या नाहीत. पुणे शहरामध्ये येत्या 14 डिसेंबरपासून शाळा पुन्हा उघडण्याचा पालिकेचा मानस होता मात्र विद्यार्थ्यांचे आरोग्य लक्षात घेता आणि पालकांकडून अत्यल्प आलेली हमीपत्र याच्यापार्श्वभूमीवर आता शाळा 3 जानेवारी 2021 पर्यंत न उघडण्याचा निर्णय झाल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. महाराष्ट्रात 5वी ते 8 वीचे वर्ग आरोग्य विभागाकडून परवानगी मिळाल्यानंतरच पुन्हा सुरू करणार: शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड.

कोरोनाचं संकट नियंत्रणामध्ये आलं असलं तरीही लहान मुलांना असलेला धोका लक्षात घेता सध्या शाळा पुन्हा उघडण्याचा निर्णय लांबणीवर टाकत असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. पालिकेच्या शाळेसोबतच सर्व खाजगी शाळांसाठीदेखील हा नियम लागू असणार आहे. राज्य सरकारने सध्या स्थानिक प्रशासन आणि जिल्हाधिकार्‍यांना कोविड 19 परिस्थितीचा आढावा घेऊन पूर्ण खबरदारीने शाळा पूर्ण उघडण्यासाठी निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. त्यानुसार ग्रामीण भागात काही ठिकाणी शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत. मात्र मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक मध्ये शाळा अद्याप सुरू झालेल्या नाही.

महापौर मुरलीधर मोहोळ ट्वीट

4 जानेवारी नंतरची परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. त्यावेळी देखील पालक-शिक्षकांचं मत, त्यांचं हमीपत्र याचा विचार केला जाईल. असेदेखील महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्रात कोरोना संकट फैलावण्याचं प्रमाण आता नियंत्रणामध्ये आलं आहे. काल रात्रीपर्यंत आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 24 तासांत 4268 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 2774 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1749973 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 73315 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.46% झाले आहे.