जेवणात सापडली अळी (संग्रहित संपादित प्रतिमा)

महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरस (Coronavirus) रुग्ण संख्येने 4 लाखाचा टप्पा ओलांडला आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या सरकार कोरोनाच्या चाचण्यांवर लक्ष केंद्र करत असलेले दिसून येत आहे. राज्यात अगदी शहरांपासून ते गाव पातळी पर्यंत क्वारंटाइन सेंटर्स (Quarantine Centre) उभारले आहेत. या ठिकाणी संशयित रुग्णांसह, कोरोना बाधित रुग्णांची काळजी घेतली जात आहे. मात्र आता सातारा (Satara) जिल्ह्यातील, कराड तालुक्यामधील सैदापूर येथील क्वारंटाइन सेंटरमध्ये पुरवण्यात येणाऱ्या अन्नामध्ये चक्क अळी (Worm) सापडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत प्रशासनाकडे तक्रार केली असता, अशी चूक पुन्हा होणार नाही व घडलेल्या गोष्टीची चौकशी होईल असे सांगण्यात आले आहे.

कोविड सेंटरमध्ये भरती असलेल्या दिलीप जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कराड तालुक्यातील उंब्रज गावामधील एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 10-12 जणांना सैदापूर येथील सेंटरमध्ये क्वारंटाइन करण्यात आले आहे. आज दुपारी जेव्हा या लोकांना जेवण देण्यात आले, त्यावेळी निलेश साळुंखे यांना देण्यात आलेल्या आमटीमध्ये चक्क अळी असल्याचे आढळले. त्यानंतर ताबडतोब याबाबत प्रशासनाकडे तक्रार केली गेली. प्रशासनाने सुरुवातील उडवा उडवीची उत्तरे दिल्याने काही वेळ गोंधळाचे वातावरणही निर्माण झाले होते. त्यानंतर इथल्या कोविड सेंटर प्रशासनाने माफी मागून पुन्हा अशी चूक होणार नसल्याचे आश्वासन दिले व रुग्णांना दुसरे अन्न पुरवले.

पहा फोटो- 

मात्र घडल्या प्रकाराबाबत प्रशासन गंभीर नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे. एकूणच इथल्या अन्नाबाबत सांशक असल्याची भावना रुग्णांनी  व्यक्त केली आहे. गेल्या तीन दिवसांपासून इथल्या क्वारंटाइन सेंटरमध्ये हे लोक भरती आहेत, मात्र अजूनही प्रशासनाकडून पुढील गोष्टींची स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. कोरोनाची चाचणी होणार का नाही? होणार असेल तर कधी? अजून किती दिवस क्वारंटाइन केले जाणार अशा अनेक गोष्टींबाबत अजूनही संभ्रम कायम आहे. दरम्यान याआधी अमरावती, यवतमाळ, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर अशा अनेक ठिकाणी रुग्णांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले गेल्याचे प्रकार घडले आहेत. (हेही वाचा: महाराष्ट्र: लातुर येथे कोरोनाबाधित रुग्णाच्या नातेवाईकांचा डॉक्टरवर चाकूहल्ला)

तसेच अनेक विलगीकरण कक्षांची दुरावस्ताही समोर आली आहे. अनेक ठिकाणी मुलभूत सुविधांचा अभाव असल्याचे निदर्शनास आले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यात ‘स्वच्छता’ ही गोष्ट महात्वाची भूमिका बजावते. तसेच सकस अन्न रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात मदत करते. मात्र महाराष्ट्रातील अनेक विलगीकरण कक्षांमध्ये नागरिकांना याच गोष्टींची झगडावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे. याच भीतीने लोकांची ‘कोरोनामुळे मेलो तरी चालेल मात्र विलगीकरण कक्षात जायचे नाही’, अशी धारणा बनत चालली आहे.