दुचाकी आणि एसटी बस यांच्यात झालेल्या भीषण धडकेत (Bus-Bike Accident) तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे वेगवेळ्या कुटुंबातील असलेले हे तरुण त्यांच्या आईवडीलांचे एकुलते एक अपत्य होते. हाताखाली आलेली मुले काळाने अशी आकस्माकपणे हिरावून घेतल्याने अवघ्या गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिन्ही तरुण पुणे (Pune) जिल्ह्यातील पुरंदर (Purandar) तालुक्यात असणारे थोपटेवाडी गावचे आहेत. सातारा (Satara) जिल्ह्यातील लोणंद (Lonand) येथे या तरुणांची दुचाकी आणि एसटी बस यांच्यात अपघात घडला. ज्यामुळे तिघाचेही प्राण गेले.
ओंकार संजय थोपटे, पोपट थोपटे, अनिल नामदेव थोपटे अशी अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. हे तिन्ही युवक पुरंदर तालुक्यातील थपटेवाडी येथील पिंबरे बुद्रुकचे रहिवासी होते. महाविद्यालयीन जीवन जगत असलेले हे तरुण काही कामानिमित्त लोणंद येथे गेले होते. काम झाल्यावर घरी परतत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. लोणंद शहरापासून अवघ्या दोन किलोमिटर अंतरावर असलेल्या लोणंद -निरा रस्त्यावर रेल्वे उड्डाणपूल आहे. याच उड्डाणपुलाजवळ मंगळवेढा-पुणे एसटी बस (क्रमांक एमएच 20 बीएल 4158) निरेकडून लोणंदच्या दिशेने निघाली होती. याच वेळी हे तिन्ही तरुण आपल्या एमएच 12 आरव्ही 3158 क्रमांकाच्या दुचाकीवरुन निघाले होते. या वेळी दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर धडक झाली. (हेही वाचा, Ahmednagar-Pune Highway Horrific Accident: अहमदनगर-पुणे महामार्गावर भीषण अपघात, चार ठार, 11 जखमी)
गावच्या यात्रेवर दु:खाचे सावट
ग्रामीण भागात सध्या यात्रांचा हंगाम आहे. त्यामुळे थोपटेवाडी येथेही ग्रामदैवत असलेल्या हुनमानाचा उत्सव सुरु होता. मात्र, गावातील होतकरु असलेली ही मुले जीवानीशी हाकनाक गेल्यामुळे अवघ्या गावकऱ्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. धक्कादायक म्हणजे तिन्ही तरुण वेगवेगळ्या कुटुंबातील आणि त्यांच्या आईवडीलांचे एकुलते एक अपत्य होते. त्यामुळे हे कुटुंबीय आणि त्यांच्या नातेवाईकांच्या दु:खाला पारावरच राहिला नाही.