टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) मध्ये चमकदार कामगिरी करणार्या प्रवीण जाधव(Pravin Jadhav) ला मायदेशी परतल्यानंतर काही जणांकडून धमक्या मिळत असल्याचं वृत्त समोर आलं आहे. दरम्यान यामध्ये आता राजकीय नेत्यांनी उडी घेत प्रविणने आपल्या खेळावर लक्ष केंद्रीत करावं वाद गाव पातळी वर सोडवला जाईल त्याला गाव सोडावं लागणार नाही अशी भूमिका घेत सातार्यामधील नेत्यांनी प्रविणला आपला पाठिंबा दिला आहे.
प्रविण जाधव हा भारतीय तीरंदाज आहे. महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यातील सरडे गावात त्याचे लहानसे घर आहे. जाधव कुटुंबाला त्यांच्या घराची डागडुजी करायची आहे पण शेजार्यांकडून धमक्या मिळत असल्याचा दावा प्रवीणच्या वडिलांनी केला आहे. यामध्ये जाधव कुटुंबाने सरडे गाव सोडून जाण्याची देखील भावना बोलून दाखवली होती. या प्रकारानंतर क्रीडा आणि राजकीय क्षेत्रामध्ये त्याचे पडसाद दिसायला लागले आहेत. मीडीयाशी बोलताना पोलिस अधिक्षक अजयकुमार बंसल यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रविण जाधव यांच्या कुटुंबाला कायदेशीर संरक्षण दिले जाईल.
महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालत प्रविण जाधव आणि त्यांच्या शेजार्यांचा वाद हा भावकीतील भांडणांचा असून त्यावर गाव पातळीवर उत्तर शोधलं जाईल असं सांगितलं आहे. आमदार शशिकांत शिंदे यांनी देखील पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी बोलून या प्रकरणात योग्य ती मध्यस्थी करण्यासाठी मदत करणार असल्याचं सांगितलं आहे.
मीडीया रिपोर्ट्सनुसार प्रवीण जाधव पूर्वी लहानशा घरात राहत होता. नंतर तो सिन्य दलामध्ये भरती झाला त्याने पक्के घर बांधले आणि वाद सुरू झाला. 5-6 जणांनी प्रवीणच्या कुटुंबाला धमकावले. सारी कागदपत्रं असून देखील ते आम्हांला घर दुरूस्त करायला देत नसल्याचं प्रवीणचं म्हणणं आहे. सध्या प्रवीण टोकियो वरून भारतात परतला आहे पण तो सध्या हरियाणा मध्ये सोनिपत येथील प्रशिक्षण शिबिरामध्ये आहे.