सातारा: सेल्फी काढणं पडलं महागात; 600 फूट दरीत कोसळला तरुण
Selfie | Representational Image (Photo Credits: pixabay)

सेल्फी काढणं जीवावर बेतल्याच्या अनेक घटना यापूर्वीही कानावर आल्या आहेत. सातारा (Satara) जिल्ह्यातील कास पठाराजवळ (Kaas Plateau) देखील अशीच एक घटना घडली आहे. सेल्फी काढण्याच्या नादात एक तरुण 600 फूट दरीत कोसळला. मात्र 'काळ आला होता पण वेळ आली नव्हती', असेच काहीसे घडले आणि तब्बल 25 तासानंतर तरुणाचा जीव वाचवण्यात रेक्स्यु टीमला यश आले. कनिष्क जांगळे असे या तरुणाचे नाव असून तो 22 वर्षांचा आहे. गुरुवारी संध्याकाळी साधारणपणे 6 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

कनिष्क जांगळे हा तरुण साताऱ्याच्या यादोगोपाळ परिसरात राहतो. तो गुरुवारी संध्याकाळी कास पठारावर फिरण्यासाठी गेला होता. पण शुक्रवारी सकाळपर्यंत तो परत न आल्याने कुटुंबियांनी शोध घ्यायला सुरुवात केली. गणेशखिंड परिसरातील मंदिराजवळ त्याची मोटारसायकल सापडली. त्यानंतर पुढे जाऊन पाहिल्यानंतर कोणीतरी खाली पडल्याचं दिसून आलं. हे लक्षात येताच कुटुंबियांनी शिवेंद्रसिंह राजे रेस्क्यु टीमला पाचारण केलं. (Two Drown in Maval: सेल्फी काढताना 8 वर्षीय मुलगा पडला पाण्यात, वाचवण्यासाठी गेलेल्या वडील आणि मामांचा बुडून मृत्यू)

रेस्क्यु टीमने कनिष्कसाठी शोध मोहिम सुरु केली. तेव्हा 600 फुटांवर कनिष्क जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला. त्याला बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तो शुद्धीवर आल्यानंतर त्याने घडलेला प्रकार सांगितला. दरीच्या टोकावर उभं राहून सेल्फी काढाताना कनिष्कचा पाय घसरला आणि तो दरीत कोसळला. दरम्यान, रेक्स्यु टीमने शुक्रवारी दुपारी 3 च्या सुमारास बचावकार्य सुरु केले होते. त्यानंतर त्याला बाहेर काढण्यात संध्याकाळाचे 7 वाजले.