Two Drown in Maval: सेल्फी काढताना 8 वर्षीय मुलगा पडला पाण्यात, वाचवण्यासाठी गेलेल्या वडील आणि मामांचा बुडून मृत्यू
Drown | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

मोबाईलवर सेल्फी (Selfie) काढण्याचे फॅड गेल्या काही वर्षांमध्ये बरेच वाढले आहे. याचबरोबर सेल्फीमुळे घडणाऱ्या घटनांमध्येही वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. यातच पुण्यातील मावळ (Maval) परिसरातील कुंडमळा (Kund Mala) येथे सेल्फी काढत असताना पाण्यात पडलेल्या मुलाला वाचवण्यासाठी गेलेल्या वडिलांचा आणि मामांचा पाण्यात पडून दुर्देवी मृत्यू झाला आहे. सुदैवाने, त्याठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांना 8 वर्षीय मुलाला वाचवण्यात यश आले आहे. सेल्फी जीवघेणा ठरत असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आयुष नरवडे (वय, 8) आपले वडील राकेश लक्ष्मण नरवडे (वय, 36) आणि मामा वैष्णव भोसले (वय, 30) यांच्यासोबत कुंडमेळा येथे फिरायला गेले होते. जून महिन्यात दमदार पाऊस झाल्याने या ठिकाणी धबधबे, नद्या ओसंडून वाहत आहेत. दरम्यान, पाण्याच्याच प्रवाहाजवळ उभा राहून आयुषला सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. याचवेळी आयुषचा पाय घसरला आणि तो पाण्याच्या प्रवाहात पडला. यामुळे घाबरलेल्या राकेश आणि वैष्णव यांनी कोणताही विचार न करता थेट पाण्यात उडी घेतली. परंतु, त्या ठिकाणी मासे पकडण्यासाठी आलेल्या काही जणांनी पाण्यात दोरी टाकून आयुषला बाहेर काढले. मात्र, राकेश आणि वैष्णव या दोघांचाही शोध लागला नाही. यामुळे एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले. अखेर कुंडमळ्याच्या प्रवाहात या दोघांचे मृतदेह आढळल्याची माहिती तळेगाव एमआयडी पोलिसांनी दिली आहे. हे देखील वाचा- Online Fraud: मुंबईच्या अंधेरी येथील महिलेची मेट्रिमोनी साइटवरून फसवणूक; गुन्हा दाखल

सेल्फीमुळे याआधीही अनेक घटना घडल्या आहेत. पावसळ्यात ठिकठिकाणी धबधबे आणि नद्या ओसंडून वाहत असतात. अशा ठिकाणी फिरायला गेलेल्या लोकांना सेल्फीचे मोह आवरत नाही. तसेच  धोकादायक ठिकाणी उभा राहून सेल्फी घेणे अनेकांच्या जीवावर बेतले आहे.