कळवण तालुक्यातील सप्तश्रृंगी गडाच्या (Saptashrungi Gad) विकासासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या ८१ कोटी ८६ लाखांच्या पर्यटन विकास आराखड्यास शासन स्तरावर मंजुरी देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. आज कळवण येथे कळवण व सुरगाणा तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले, नाशिक जिल्ह्यातील सप्तश्रृंगी गड देवस्थान हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे. येथे येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी व पर्यटनाच्या दृष्टीने करण्यात आलेल्या ८१ कोटी ८६ लाखांच्या पर्यटन विकास आराखड्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत होणाऱ्या बैठकीत मंजुरी देण्यात येईल.
त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून योजनांची अमंजबजावणी शासनस्तरावर करण्यात येत आहे. विविध विकास कामांवरील असलेली स्थगितीही शिथिल झाली असून येणाऱ्या काळात प्रस्तावित विकासकामांनाही मंजुरी देण्यात येऊन आर्थिक तरतूद केली जाईल. शेतकऱ्यांच्या हितास प्राधान्य देऊन कळवण तालुक्यातील ओतूर धरणासाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेस मंजूरी देण्यात येणार असून हा प्रश्न निकाली निघणार आहे. शेतकऱ्यांसाठी शासनाने शून्य टक्के व्याजदराने ३ लाखांपर्यंत कर्ज देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला असून शेतकऱ्यांना याचा निश्चितच लाभ होत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
शेतकऱ्यांना वित्त पुरवठा करणारी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस उर्जितावस्थेसाठी शासनस्तरावर तोडगा काढला जाईल परंतु यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कळवण व सुरगाणा तालुक्यातील ४९४ कोटींच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. चणकापूर धरण परिसरात माजी मंत्री स्वर्गीय ए.टी. पवार यांचे स्मारक उभारण्यासाठी सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले. (हेही वाचा: Navi Mumbai: नवी मुंबई महापालिकेकडून झाडांवर पोस्टर्स, जाहिराती लावण्यावर बंदी; उल्लंघन केल्यास होणार कारवाई)
गुजरात राज्यातील सापुतारा पर्यटन स्थळाच्या धर्तीवर आदिवासी जनतेला रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी सुरगाणा व कळवण तालुक्यात पर्यटनास चालना देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येईल. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांचा विकासाच्या दृष्टीने आराखडा तयार करण्यात येईल.