नवी मुंबई महानगरपालिकेच्या (NMMC) उद्यान व वृक्ष प्राधिकरणाने झाडांवर लावलेले पोस्टर्स, बॅनर आणि जाहिराती तीन दिवसांच्या आत काढून टाकण्याचे आवाहन केले आहे. अशा गोष्टींमुळे झाडांना हानी पोहचत आहे, तसेच शहराच्या सौंदर्याला बाधा येत असल्याचे प्राधिकरणाचे म्हणणे आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यासह कठोर कारवाईचा इशाराही नागरी संस्थेने दिला आहे.
एनएमएमसी परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली आहे. विपणन धोरणांचा एक भाग म्हणून, व्यावसायिक युनिट्स मुख्यतः त्यांच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांना खिळे ठोकून जाहिराती लावतात. सर्वसाधारणपणे पोस्टर्स आणि स्टिकर्सच्या स्वरूपात अशा जाहिराती लावल्या जातात. मात्र, यामुळे झाडांची हानी होते आणि शहराचे सौंदर्य बिघडते, तसेच त्याचा वाहनचालकांनाही त्रास होतो. म्हणूनच झाडांवर खिळे लावलेले पोस्टर्स, जाहिराती 3 दिवसांत काढल्या जाव्यात असे नगरी संस्थेने सांगितले आहे.
उद्यान विभाग आणि वृक्ष प्राधिकरणाने हे जाहीर आवाहन प्रसिद्ध झाल्यापासून तीन दिवसांच्या आत झाडांवर लावलेले साहित्य आणि जाहिराती काढून टाकण्याची विनंती केली आहे. या कालावधीनंतर जाहिराती आढळून आल्यास, तसेच झाडांना खिळे ठोकल्यास किंवा पोस्टर्स, भित्तीचित्रे लावल्यास, महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंधक कायदा, 1995 अंतर्गत नजीकच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आवाहन नोटिसीत नमूद करण्यात आले आहे. (हेही वाचा: Mumbai Water Cut: महावितरणच्या कामांसाठी 9 ऑक्टोबर रोजी नवी मुंबईत 12 तास पाणीपुरवठा बंद)
झाडांनाही जीवन असते, याकडे नॅटकनेक्ट फाऊंडेशनने लक्ष वेधले. यासह खिळे, पोस्टर्स आणि बॅनर स्वच्छ नवी मुंबईचे सौंदर्य बिघडवतात. झाडांना दिव्यांनी सजवणे देखील भयंकर आहे, असे फाऊंडेशनचे म्हणणे आहे. दरम्यान, नागरी संस्थेच्या निर्णयाचे सर्वांचे स्वागत आहे, असे नागरी कार्यकर्ते राजीव मिश्रा यांनी सांगितले.