देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी स्थापन केलेलं सरकार फक्त ८० तास टिकू शकलं. त्यामुळे आज संपूर्ण दिवसात घडलेल्या या राजकीय घडामोडींमुळे शरद पवार यांना महाराष्ट्राच्या राजकारणाचे चाणक्य म्हटले जात आहे. तसेच शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीव्ही ९ मराठी या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार हे भारतचे पंतप्रधान बनण्यासाठी पाहिजे ती किंमत मोजायला तयार आहेत असा गौप्यस्फोट केला.
ते म्हणाले, "शरद पवारांचे राजकारण भाजपला कळणार नाही. मी त्यांना जवळून पाहिलं. त्यांचा अनुभव मी घेतला आहे. या सर्व राजकारणामागे शरद पवार आहेत."
तसेच अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील समीकरणाबद्दल बोलणं संजय राऊत यांनी टाळलं. ते म्हणाले की शरद पवारच त्यावर भाष्य करू शकतील कारण तो त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे.
इतक्यावरच न थांबता त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या राजीनाम्याबाबत बोलताना ते म्हणाले, “मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागणारच होता. त्यांनी माझ्यावर खूप खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. जे मी सांगत होतो, तेच आज झालं आहे. तुम्ही स्थापन केलेलं सरकार बेईमानीचे सरकार होते. तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेशी खोट बोललात," अशा टीका संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केल्या आहेत.