'आग जलनी चाहिये' म्हणत संजय राऊत यांनी शेअर केल्या दुष्यंत कुमार यांच्या ओळी; महाराष्ट्रात सत्ता संघर्ष शिगेला
Sanjay Raut Tweet (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री (Maharashtra CM) पदावरून सत्ता संघर्ष शिगेला पोहचला असताना दिवसागणिक वातावरण आणखीनच तापत असल्याचे दिसतेय.निवडणुकीच्या आधी महायुती करून भावंडासारखे राहणारे शिवसेना (Shivsena) आणि भाजपा (BJP) पक्ष आता एकमेकांच्या विरुद्ध उभे ठाकले आहेत. याच अंतर्गत वादात शिवसेनेकडून संजय राऊत (Sanjay Raut) तर भाजपाकडून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात रोजची जुंपली पाहायला मिळतेय, वास्तविक फडणवीस यांनी मौन स्वीकारल्याने संजय राऊत यांच्याकडूनच नेहमी टीकास्त्रांचा भडीमार केला जात आहे. आजही राऊत यांनी दुष्यंत कुमार (Dushyant Kumar) यांच्या ओळी शेअर करत पुन्हा एकदा भाजपाला टोलवले आहे. याशिवाय आपण घेतलेली भूमिका ही वैयक्तिक नसून बदल आणण्यासाठी हाती घेतलेली लढाई आहे असे देखील अप्रत्यक्ष रित्या सुचवले आहेत.

संजय राऊत यांनी आज सकाळी केलेल्या पोस्ट मध्ये “सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए। मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही, हो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए।” या ओळी लिहिल्या आहेत. सध्याच्या राजकारणाशी संबध लावल्यास, शिवसेनेचा गाडा ओढणाऱ्या संजय राऊत यांच्या आक्रमक भूमिकेवर प्रश्न करणाऱ्यांना हे एक उत्तर आहे असेही म्हणता येईल.

संजय राऊत ट्विट

मुख्यमंत्रीपद वगळता 50-50 फॉर्म्युला स्वीकारण्यास भाजप तयार; सत्तावाटपाचा चेंडू शिवसेनेच्या कोर्टात - सूत्र

दरम्यान, राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना महाराष्ट्राच्या सत्तेचा प्रश्न आहे महाराष्ट्रातच सुटणार आहे आणि त्यासाठी शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवणे हे उत्तर आहे असेही ते म्हणाले. संजय राऊत यांच्या आक्रमक भूमिकेचे कौतुक करताना कॉग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुद्धा पुढे येताना दिसत आहेत, आजही जितेंद्र आव्हाड यांनी या साऱ्यावर ट्विट करत राऊत यांची महाभारतातील संजय सोबत तुलना केली आहे