मुख्यमंत्रीपद वगळता 50-50 फॉर्म्युला स्वीकारण्यास भाजप तयार; सत्तावाटपाचा चेंडू शिवसेनेच्या कोर्टात - सूत्र
Shiv Sena-BJP 50-50 Formula| Image only representative purpose (Photo credit: pixabay)

शिवसेना-भाजप (Shiv Sena-BJP) यांच्यातील सत्तावाटपाचा तिढा अद्याप न सुटल्याने महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष एका टोकावर येऊन पोहोचला आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षातील हा संघर्ष कोणते टोक गाठणार याबात उत्सुकता असतानाच भाजप 50-50 फॉर्म्युला (Shiv Sena-BJP 50-50 Formula) स्वीकारण्यास तयार असल्याचे वृत्त आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार मुख्यमंत्रीपद (Chief Minister) वगळता शिवसेनेने लाऊन धरलेला 50-50 फॉर्म्युला स्वीकारण्यास भाजप तयार आहे. खासगी वृत्तवाहिनी एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे. या वृत्ताच्या निमित्ताने भाजपने दिलेली ऑफर शिवसेना स्वीकारणार का? याबाबत पुन्हा नवी उत्सुकता निर्माण झाली आहे.

'आमचं ठरलंय' असं छातीठोकपणे सांगणाऱ्या शिवसेना-भाजपमध्ये सत्तावापाच्या 50-50 फॉर्म्युल्यावरुन जोरदार सामना रंगला आहे. सत्तावाटपाच्या समसमान सूत्रानुसार शिवसेना मुख्यमंत्री पदावर हक्क सांगत आहे. तर, भाजप सत्तावाटपाच्या सूत्रात मुख्यमंत्रीपदाबाबत असे काही ठरलेच नव्हते, असे सांगत आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष परस्परांवर दबावतंत्राचा वापर करत आहेत.

दरम्यान, शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि रामदास कदम यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे एक शिष्ठमंडळ नुकतेच राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेऊन आले. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी सांगितले की, शिवसेनेने राज्यपालांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत राज्यातील विद्यमान राजकीय स्थितीची माहिती दिली. तसेच, आम्ही एका मर्यादेत राहून राज्यपालांशी चर्चा केली, असेही राऊत यांनी सांगितले. (हेही वाचा, राज्यातील सरकार स्थापनेत शिवसेनेचा अडथळा नाही; राज्यपाल कोश्यारी यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया)

दरम्यान, महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आता दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची आज राजधानी दिल्लीत चर्चा सुरु आहे. त्यामुळे सत्तास्थापनेचा तिढा सोडविण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष शरद पवार हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दैऱ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजप राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. तर, शरद पवार हे काँग्रेस पक्ष हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. दोन्ही नेत्यांच्या या बेठीमधील तपशील विस्ताराने अद्याप बाहेर आला नाही. मात्र, नजीकच्या काळात या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलतापालथ झाल्याचे पाहायला मिळू शकते.