Sanjay Raut | (Photo Credits: X)

शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नव्या संसद भवन इमारतीवरुन (New Parliament) केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नव्या संसद इमारतीमध्ये ऐतिहासिक असे काहीच नाही. तेथे केवळ गोंधळ आणि मेगा शो आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ही इमारत म्हणजे पीएम मोदी यांचे मल्टिप्लेक्स म्हटले ते बरोबरच आहे. या इमारतीमध्ये प्रचंड गुदमरते. आम्हाला जुन्या संसद इमारतीमध्येच जाऊ द्या, अशी सर्वच संसद सदस्यांची इच्छा असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यांनी आपली टीका कायम ठेवत म्हटले आहे की, नव्या इमारीत (संसदेच्या) हवा आणि पाणीही नाही. इथे आल्यावर एखाद्या बँकेट हॉलमध्ये आल्यासारखे वाटते. मुंबई येथे ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

तब्बल 20 हजार कोटी रुपये खर्चून नव्या संसद भवनाची इमारत उभारण्यात आली. पण ती काहीही कामाची नाही. कोणाच्या सांगण्यावरुन ही इमारत उभारली गेली. इमारत उभारताना केवळ ज्योतिषाचा सल्ला घेतला गेला. इमारतीचे महत्त्व आणि उपयोग विचारात घेतले गेले नाही. अशा प्रकारचा खर्च म्हणजे केवळ आणि केवळ पैशाचा अपव्यय आहे. विशेष अधिवेशन नव्या संसदेमध्ये बोलावून तुम्हाला असे काय मिळाले? खरे तर काही विशेष कारणांसाठीच विशेष अधिवेषन बोलवायचे असते. पण तसे काहीच नव्हते तरीही ते बोलावण्यात आले. कारण, त्या दिवशी पंतप्रधान मोदी यांचा तिथीनुसार वाढदिवस होता. केवळ त्याच कारणासाठी अधिवेशन बोलावण्यात आले, असा घणाघाती आरोप करत संजय राऊत यांनी हल्ला चढवला. खरेतर पंतप्रधानांच्या तिथीनुसार वाढदिवसानिमित्त त्यांना महिला विधेयक आणून ते मंजूर करुन घ्यायचे होते. भाजप मुख्यालयामध्ये त्यांना त्याचा उत्सव साजरा करायचा होता. पंतप्रधानांना स्वत: वरती फुले उधळून घ्यायची होती. केवळ म्हणूनच हा घाट घालण्यात आला का? असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला.

व्हिडिओ

दरम्यान, शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाला मोठा वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिल्ली येथे आले. त्यांना जर या प्रकरणात दिल्लीला येऊन सल्ला मसलत करावी लागत असेल तर आमच्या मनात त्यांच्याविषयी ज्या शंका आहेत. त्याला बळच मिळते, असा दावा संजय राऊतांनी केला. आगोदरच घटनात्मक पेच निर्माण झाला असताना पाठिमागील काही महिन्यांमध्ये विधानसभा अध्यक्षांनी तो पुन्हा आणखी वाढवला आहे. केवळ 8 दिवसांमध्ये कारवाईला सुरुवात करण्याबाबत स्पष्ट निर्देश असताना त्यांनी वेळकाढूपणा केला, असेही राऊत म्हणाले.