पुणे: संग्राम थोपटे यांना मंत्रिपद डावलले; आक्रमक कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवन फोडले
Maharashtra Congress (Photo Credits: File Photo)

Uddhav Thackeray Cabinet Expansion: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार काल (30 डिसेंबर 2019) पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि राष्ट्रीय काँग्रेस (Congress) या तिन्ही पक्षांमध्ये नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. पुणे काँग्रेसमध्ये मात्र या नाराजीनाट्याचे पडसाद काहीसे आक्रमक आणि हिंसक रुपात पाहायला मिळाले. पुणे जिल्ह्यातील काँग्रेस नेते आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopate) यांना मंत्रिपद मिळू शकले नाही. त्यामुळे नाराज झालेल्या संग्राम थोपटे यांच्या काँर्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी पुणे (Pune) शहरातील काँग्रेस भवन (Congress Bhavan) इमारतीत तोडफोड केली.

पुणे शहरात असलेल्या काँग्रेस भवन परिसरात संग्राम थोपटे यांचे कार्यकर्ते आणि समर्थक मंगळवारी सांयकाळी मोठ्या प्रमाणावर दाखल झाले. त्यांनी संग्राम थोपटे जिंदाबाद... काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मुर्दाबाद अशा घोषणा देत तोडफोड करण्यास सुरुवात केली. या वेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना संग्राम थोपटे यांना काँग्रेसने शब्द दिला परंतू तो शब्द पाळला नाही. निवडणूक काळात काँग्रेस नेतृत्वाने जनतेला अवाहन करत थोपटे साहेबांना विजयी करा त्यांना मंत्रीपद द्यायचे काम आम्ही करु अशा शब्द काँग्रेस नेतृत्वाने दिला होता. मात्र, हा शब्द पाळला नसल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी या वेळी केला. आपला राग प्रदेश काँग्रेसवर असल्याचेही या कार्यकर्त्यांनी या वेळी सांगितले.

दरम्यान, आपण सर्व जण काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असल्याचेही हे कार्यकर्ते प्रसारमाध्यमांना सांगत होते. काँग्रेस भवन परिसरात तोडफोड होत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पुणे पोलिसांनी घटनास्थळावर तातडीने धाव घेतली. या वेळी पुणे पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतली. (हेही वाचा, मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये नाराजीनाट्य; मित्रपक्षांचाही रुसवा कायम)

दरम्यान, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा तिन्हीही पक्षांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. काही नेत्यांनी ही नाराजी उघड बोलून दाखवली आहे. तर, काही नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी ही नाराजी बोलून दाखवली आहे. मात्र, मुळात प्रश्न असा आहे की, हे सरकार तीन पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केले आहे. त्यामुळे मंत्रिपद देण्यासाठी नेतृत्वावर मर्यादा आहे. या मर्यादेचा विचार करुनच नेतृत्वाने मंत्रिपदांचे वाटप केल्याची भावनाही काही नेत्यांनी व्यक्त केली आहे.