मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये नाराजीनाट्य; मित्रपक्षांचाही रुसवा कायम
Maha Vikas Aghadi Government | (Photo credit: Archived, edited, symbolic image )

CM Uddhav Thackeray Cabinet Expansion: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray ) यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार विधान भवन येथे आज (30 डिसेंबर 2019) दुपारी पार पडला. या विस्तारानंतर शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस (National Congress) या तीनही पक्षांमध्ये जोरदार नाराजी पाहायला मिळत आहे. त्यामुळे या मंत्रिमंडळ विस्तारानंतर महाविकासआघाडीच्या या तिन्ही प्रमुख पक्षांमध्ये कही खुशी कही गम असे चित्र पाहायला मिळत आहे. या नाराजीमुळे काही आमदारांनी शपथविधीस दांडी मारली तर काहींनी पक्षश्रेष्ठींची भेट घेण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.

उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. तसेच, ते शिवसेना पक्षप्रमुखसुद्धा आहेत. त्यामुळे या वेळी शिवसेना कोट्यातील मंत्रिपदांचे वाटप करताना ठाकरे यांनी धक्कातंत्राचा जोरदार वापर केला. या धक्कातंत्राचा फटका अनेक शिवसेना दिग्गजांना बसला. गेल्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या अनेक नेत्यांना उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ विस्तारात डच्चू दिला. यात दीपक केसरकर, रविंद्र वायकर, तानाजी सावंत, दिवाकर रावते, रामदास कदम यांचा समावेश आहे.

दुसऱ्या बाजूला शिवसेनेतील अनेक इच्छुकांनाही आपल्या आकांक्षांना मुरड घालावी लागली आहे. यात शिवसेना खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत हेसुद्धा शपथविधी कार्यक्रमावेळी नाराज असल्याचे पाहायला मिळाले. या नराजीतून खा. संजय राऊत आणि आमदार नितीन राऊत हे गैरहजर असल्याचे पाहायला मिळाले. संजय राऊत यांची अनुपस्थिती ही या कार्यक्रमात चर्चेचा विषय ठरली होती. (हेही वाचा, उद्धव ठाकरे यांचा मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना दिग्गजांना धक्का; जुन्यांना डच्चू, नव्यांना संधी)

दरम्यान, काँग्रेस पक्षातही मंत्रिपदावरुन मोठे नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. मंत्रिपद न मिळाल्याने काँग्रेस आमदारांचा एक गट नाराज असल्याची चर्चा असून, हा गट लवकरच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार असल्याचेही समजते.

Maharashtra Cabinet Minister List 2019: 25 कॅबिनेट,10 राज्यमंत्री महाविकास आघाडीचा मंत्रिमंडळ विस्तार Watch Video 

दरम्यान, काँग्रेसच्या या गटाने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सोनिया गांधी यांची दिशाभूल केली. त्यांना योग्य ती माहिती दिली नसल्याचा आरोपही केला आहे. हा गट काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लीकार्जून खडगे यांची भेट घेणार असल्याचे वृत्तही प्रसारमाध्यमांनी दिले आहे.