आंघोळ करण्यासाठी कृष्णा नदी (Krishna River) पात्रात गेलेल्या एका १२ वर्षीय मुलाला मगरीने ओढून नेले. ही घटना सांगली (Sangli) गुरुवारी (16 एप्रिल 2019) दुपारी घडली. आकाश मारुती जाधव (मूळ रा. निंबाळ आरएस., ता. इंडी, जि. विजापूर) असे या मुलाचे नाव आहे. मगरीने ओढून नेल्यावर आकाश बेपत्ता झाला. आकाशच्या बेपत्ता होण्याची बातमी कळताच यांत्रिक बोटीच्या सहाय्याने त्याचा कृष्णा नदीपात्रात शोध घेतला जात होता. गुरुवारी रात्री उशीरपर्यंत आकाशचा शोध घेणे सुरुच होते.
प्रप्त माहितीनुसार, बाळासाहेब लांडे यांची कृष्णा नदीकाठावर जमीन आहे. या जमीनीतील काही भागावर विटभट्टी मजूरांची कुटुंबं निवासाला आहेत. यात मारुती कोमू जाधव (मूळ रा. निंबाळ आरएस.ता. इंडी, जि. विजापूर) यांचेही कुटुंब आहे. मारुती जाधव यांची मुलं त्यांच्या गावी असतात. मात्र, शाळेला सुट्टी असल्याने त्यांची मुलं त्यांच्याकडे आली होती. दरम्यान, मारुती जाधव यांच्या पत्नी कपडे धुण्यासाठी नदीवर गेल्या होत्या. त्यांच्यासोबत दोन मुल व मुलगा आकाश हेसुद्धा नदीवर गेले होते. आकाश हा नदीत उतरुन त्यांच्या जवळच आंघोळ करत होता. या वेळी पाण्यातील मगरीने आकाशवर हल्ला केला.
मगरीने मुलावर हल्ला केल्याचे जाधव यांच्या पत्नीने पाहिले. मात्र, त्या काहीच करु शकल्या नाहीत. घाबरलेल्या आकाशच्या आईने विटभट्टीकडे धाव घेतल घडला प्रकार सांगितला. विटभट्टीवरील लोक धावत घटनास्थळावर पोहोचले मात्र, तोपर्यंत संगळे शांत झाले होते. घडल्या प्रकाराची माहिती कळताच पोलिस पाटील सतीश पाटील यांनी वनविभागाला घडल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर वन विभागाचे अधिकारी घटनास्थळावर दाखल झाले. कसून तपास केला असता मृत मुलाचे शव घेऊन मगर नदीपात्रात फिरत होती. मुलाचे शव काढण्यासाठी यांत्रिक बोटीने प्रयत्न सुरु होते. मात्र, बराच वेळ झाला तरी, याला यश येत नव्हते. (हेही वाचा, इंडोनेशियात पाळलेल्या मगरीच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू (Video))
दरम्यान, रात्री उशीरपर्यंत शोध घेऊनही आकाशचा मृतदेह सापडला नाही. शुक्रवारी सकाळीही आकाशच्या मृतदेहाचा शोध घेण्याचे काम सुरु होते.