एकाच कुटुंबातील 9 जणांनी विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना सांगली (Sangli) जिल्ह्यात घडली आहे. या घटनेत सर्वांचा मृत्यू झाला आहे. ही घटना मिरज (Miraj Taluka) तालूक्यातील म्हैसाळ (Mhaishal Village) या ठिकाणी घडली आहे. मृतांतील सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याने ही सामूहिक आत्महत्या (Mass Suicide) किंवा विषबाधेचा प्रकार असावा असा संशय व्यक्त केला आहे. घटनेची माहिती कळताच पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल झाले आहेत. मृतदेहांचा पंचनामा करुन तो शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. दरम्यान, या कुटुंबाने आर्थिक ताणतणावातून हे टोकाचे पाऊल उचलले असावे असा प्राथमिक अंदाज आहे.
एकाच कुटुंबातील 9 जणांनी आत्महत्या केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सर्वांचे मृतदेह मिरज येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे खरे कारण समोर येईल, असे पोलिसांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Bihar: एकाच कुटुंबातील 5 जणांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने समस्तीपूरमध्ये खळबळ; कर्जामुळे संकटात सापडला होता परिवार)
मृतांची नावे
डॉ. माणिक येलाप्पा वनमोरे, आक्काताई वनमोरे (आई), रेखा मानिक वनोरे (बायको), प्रतिमा वनमोरे (मुलगी), आदित्य वनमोरे (मुलगा) आणि पोपट येलाप्पा वनमोरे (शिक्षक), अर्चना वनमोरे (पत्नी), संगीता वनमोरे (मुलगी), शुभम वनमोरे (मुलगा)
प्राप्त माहितीनुसार, डॉ.माणिक यलप्पा वनमोरे आणि त्यांचा शिक्षक भाऊ पोपट यल्लपा वनमोरे या दोघांचेही मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांसमवेत (9) नरवाड रोड अंबिका नगर चौंडजे मळा आणि हॉटेल राजधानी कॉर्नर या दोन ठिकाणी आढळून आले. डॉ. माणिक येलाप्पा वनमोरे हे पशुवैद्यकीय डॉक्टर होते. डॉ. माणिक वनमोरे यांच्यासह त्यांच्या कुटुंबाचे म्हणजेच पत्नी रेखा माणिक वनमोरे,आई आकताई यल्लप्पा व्हनमोरे, मुलगी प्रतिमा माणिक व्हनमोरे, मुलगा आदित्य माणिक व्हनमोरे, पुतण्या शुभम पोपट व्हनमोरे मृतदेह राजधानी हॉटेल जवळ आढळून आले. तर त्यांचा शिक्षक भाऊ पोपट यल्लप्पा व्हनमोरे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांचे मृतदेह संगीत पोपट व्हनमोरे, मुलगी अर्चना पोपट व्हनमोरे यांचा मृतदेह नरवाड रोड अंबिका नगर चौंडजे मळा येथील घरात आढळून आले. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून पंचनामाही केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.