Sangli Mayor Election 2021Result: सांगली महापालिकेत महापौरपदी राष्ट्रवादीचे दिग्विजय सुर्यवंशी; सत्ताधारी भाजपा मध्ये फूट
Sangli Mayor Election | Photo Credits: File Image and Twitter/ NCP

सांगली महापालिकेमध्ये आज सत्ताधारी भाजपाला धक्का देत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे दिग्विजय सुर्यवंशी हे महापौर पदी विराजामान झाले आहेत. सांगली मिरज कुपवाड महापालिकेत (Sangli Miraj Kupwad Municipal Corporation) काँग्रेस-राष्ट्रवादीने यश मिळवत राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी (Digvijay Suryavanshi) यांनी महापौर म्हणून निवडले आहे. एनसीपीच्या दिग्विजय सूर्यवंशी यांनी भाजपाच्या धीरज सूर्यवंशी यांचा 3 मतांनी पराभव केला आहे. या निवडणूकीमध्ये भाजपाची 6 मतं फोडण्यात कॉंग्रेस-एनसीपी ला यश आल्याने दिग्विजय सूर्यवंशी च्या गळ्यात महापौर पदाची माळ पडली आहे.

दरम्यान सांगली मिरज कुपवाड महापालिकेमध्ये भाजप + अपक्ष- 43, काँग्रेस- 19 आणि राष्ट्रवादी काँग्रेस- 15 नगरसेवक असं पक्षीय बलाबल होते. मात्र भाजपाची 6 मतं फोडण्यात आली, 2 नगरसेवक अनुपस्थित होते. दिग्विजय सूर्यवंशी यांना 39 तर भाजपाच्याधीरज सूर्यवंशी यांना 36 मतं मिळाली. चार उमेदवारांपैकी दोघांनी माघार घेतल्यामुळे सांगली महापौरपदासाठी राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी आणि भाजपच्या धीरज सुर्यवंशी यांच्यात लढत झाली. Sangli Mayor Election: सांगीलीचा महापौर, उपमहापौर कुणाचा? राष्ट्रवादी काँग्रेस की भाजप? सस्पेन्स कायम, आज निवडणूक.

महापौर, उपमहापौर निवडीवरुन भाजपमध्ये कुरबुरी सुरु होत्या. हीच संधी साधत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आपली फिल्डिंग लावली होती. नाराज नगरसेवक आपल्या गळाला लावत त्यांनी महापालिकेमध्ये सत्ता परिवर्तन घडवून आणले. दिग्विजय सूर्यवंशी यांच्यापूर्वी सांगलीच्या महापौर पदी गीता सुतार होत्या. त्यांची मुदत 21 फेब्रुवारी रोजी संपली. सांगलीचे महापौरपद खुले असल्याने भाजपमध्ये इच्छुकांची संख्या वाढली होती. पण अंतर्गत कलहाचा फायदा घेत राष्ट्रवादीने सत्ता परिवर्तन घडवून आणले.