Sangali-Miraj-Kupwad Municipal Corporation | (File Photo)

सांगली-कुपवाड- मिरज महापालिका (Sangali-Miraj-Kupwad Municipal Corporation) महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज (23 फेब्रुवारी) निवडणूक पार पडत आहे. सध्या सांगली महापालिकेवर (Sangli Mayor Election) भाजपची (BJP) सत्ता आहे. परंतू, रिक्त झालेल्या महापौर पदामुळे भाजप सत्तेत राहणार की राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) बाजी मारणार याबाबत उत्सुकता आहे. आज सकाळी 11 वाजता महापौर, उपमहापौर पदासाठी सर्वसाधारण सभा पार पडत आहे. या सभेत नगरसेवक नेमके कोणाच्या बाजूने आपला कौल देतात याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे. कोरोना व्हायरस निर्बंधामुळे महापौर (Sangli Mayor) , उपमहापौर निवडीसाठीची सर्वसाधारण सभा ऑनलाईन घेतली जाईल.

भाजपला नाराजीनाट्याचा फटका?

सांगली महापालिकेमध्ये भाजपला बहुमत असले तरी गेल्या काही दिवसांपासून या पक्षातही चांगलेच नाराजी नाट्य रंगले आहे. नाराज असलेले भाजपचे सात नगरसेवक गेल्या काही दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे या नगरसेवकांच्या मानात नेमके आहे तरी काय याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. सोमवारी रात्री उशिरपर्यंत हे नगरसेवक नॉट रिचेबल होते, असे सांगण्यात येत आहे. नॉट रिचेबल असलेल्या या नगरसेवकांनी काही वेगळा विचार केल्यास सांगली महापालिकेतील भाजपची सत्ता धोक्यात येऊ शकते. (हेही वाचा, Sangli Mayor Election: सांगली महापौर पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा गळ, काँग्रेसची भूमिका महत्त्वपूर्ण; दिग्गजांची खलबतं)

आघाडीचा दावा 'ते' नगरसेवक आमच्या बाजूने

नाराज नगरसेवकांचे मन वळविण्यात भाजप नेतृत्वाने यश मिळवले आहे. त्यामुळे हे नगरसेवक भाजपसोबतच आहेत असे भाजपने म्हटले आहे. तर, दुसऱ्या बाजूला भाजपमधील नाराज नगरसेवक हे आमच्या बाजूने असल्याचा दावा महाविकासआघाडीद्वारे करण्यात येत आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी दावे प्रतिदावे केले जात आहेत. आता कोणाच्या दाव्यात किती तथ्य हे आजच कळणार आहे.

सांगली महापालिका पक्षीय बलाबल

 

  • भाजप + अपक्ष- 43
  • काँग्रेस- 19
  • राष्ट्रवादी काँग्रेस- 15

 

महापौर पदासाठी भाजपतील इच्छुक नावे

स्वाती शिंदे, युवराज बावडेकर, धिरज सूर्यवंशी, निरंजन आवटी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून महापौर पदासाठ इच्छुक नावे

मेनुद्दीन बागवान, दिग्विजय सुर्यवंशी, काँग्रेसकडून उत्तम साखळकर, मंगेश चव्हाण

दरम्यान, सांगली महापालिकेत आपला महापैर बसावा यासाठी पक्षनेतृत्वाने जोरदार फिल्डिंग लावली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी जोरदार रणनिती आखली आहे. आता कोणाची रणनिती कामी येते हे महापौर निवडीनंतरच कळू शकते.