
BJP Vs NCP: सांगली (Sangli) जिल्ह्यातील बोरगाव (Borgaon) येथे उपसरपंच निवडीवरून भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. ही घटना आज दुपारी दीडच्या सुमारास घडली आहे. यात राष्ट्रवादीचे ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग जनार्धन काळे यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर, अन्य दहा बारा जण किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. तसेच बोरगाव परिसरात तणाव वाढल्याने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
नामदेव पाटील यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी बोरगाव ग्रामपंचायतमध्ये विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, उपसरपंच निवडीचा कार्यक्रम सुरु होताच ग्रामपंचायत सदस्य मतदानासाठी येत असताना ग्रामपंचायतीच्या इमारतीसमोर भाजप आणि राष्ट्रवादीचे समर्थक एकमेकांना भिडले. या हाणामारीत ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग जनार्दन काळे यांना डोक्यात काठ्यांचा मार बसल्याने ते गंभीर जखमी झाले. उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जाताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला आहे. या संदर्भात महाराष्ट्र टाईम्सने वृत्त दिले आहे. हे देखील वाचा- Covid-19 Vaccine: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची लस का घेतील नाही? महत्वाची माहिती आली समोर
या घटनेनंतर बोरगाव परिसरात तणाव वाढला आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्या ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. या घटनेवर अनेक राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून संतापजणक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.