Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

महाराष्ट्रातील सांगली (Sangli) जिल्ह्यातील एका 14 वर्षांच्या किशोरवयीन मुलाची मांत्रिकाकडून हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाला भूतबाधा झाल्याचा दावा या मांत्रिकाने केला होता. मुलाच्या अंगातील भूतबाधा काढण्यासाठी त्याने मुलाला जबर मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथे ही घटना घडली. आर्यन दीपक लांडगे असे या मुलाचे नाव असून, 20 मे रोजी जखमी अवस्थेत त्याचे निधन झाले.

अंधश्रध्दा निर्मुलन कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते ग्रामस्थांमधील अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कार्य करतात.

माहितीनुसदार, या मुलाला गेल्या अनेक दिवसांपासून ताप येत होता आणि उपचार करूनही तो बरा होत नव्हता. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याला कर्नाटकातील शिरगुर येथील अप्पासाहेब कांबळे या मांत्रिकाकडे नेण्याचा निर्णय घेतला. तिथे गेल्यावर मुलाला भूतबाधा झाल्याचे कांबळे याने सांगितले व मुलाच्या अंगातून भूत काढण्यासाठी त्याला मारहाण करायला सुरुवात केली. या मारहाणीत मुलगा गंभीररीत्या जखमी झाला. त्यामुळे मुलाला मिरज येथील रुग्णालयात दाखल करावे लागले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. (हेही वाचा: Mumbai: हुंडा मागणाऱ्या व्यक्तीची मद्यधुंद अवस्थेत गर्भवती पत्नीला मारहाण; गर्भपात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल)

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी कुटुंबीयांशी संपर्क साधून मांत्रिकावर कारवाई करण्याची मागणी केल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. परंतु कर्नाटकात अंधश्रद्धा विरोधी कायदा नसल्यामुळे, पोलिसांनी कांबळे विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 304 (निष्काळजीपणामुळे मृत्यू) अंतर्गत झिरो एफआयआर नोंदवला. झिरो एफआयआर हा कोणत्याही पोलिसांना तक्रार स्वीकारण्याची आणि कारवाईसाठी योग्य स्थानकाकडे पाठविण्याची परवानगी देते. या प्रकरणाचा तपास आता कर्नाटक पोलीस करणार असल्याचे महाराष्ट्र पोलिसांनी सांगितले.