हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Mahamarg) पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) चे व्यवस्थापकीय संचालक आणि महासंचालक (वॉर रूम, पायाभूत सुविधा प्रकल्प) राधेश्याम मोपलवार यांनी ही माहिती दिली. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्रातील एक महत्वाकांक्षी महामार्ग असून तो मुंबईला नागपूरशी (Mumbai-Nagpur) जोडणार आहे.
राधेश्याम मोपलवार म्हणाले की, शिर्डी ते नागपूर 480 किलोमीटर परिसरात असलेल्या या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. त्याचे उद्घाटन 15 ऑगस्टला होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. आम्ही या संदर्भात औपचारिक संवादाची वाट पाहत आहोत. त्याचे उद्घाटन माननीय पंतप्रधान करणार आहेत.
मोपलवार पुढे म्हणाले की, ‘आम्ही या भागात रुग्णवाहिका सेवा, टोल वसुली यंत्रणा, पेट्रोल पंप, सर्व काही तयार केले आहे. पुढील वर्षी मे अखेरपर्यंत संपूर्ण 700 किमीचा रस्ता पूर्ण करण्याचा आमचा विचार आहे. महाराष्ट्र सरकारच्या २००८ च्या अधिसूचनेत एक सूत्र देण्यात आले आहे. या सुत्रानु्सार प्रवाशांकडून १.७२ रुपये प्रतिकिमी दराने टोल आकारले जाईल. हा महामार्ग 150 किमी पर्यंतच्या वेगासाठी तयार केला गेला आहे, कायदेशीर वेग मर्यादा 120 किमी प्रति तास असेल. या महामार्गावर पहिल्या वर्षी साधारण दररोज 25,000 वाहनांच्या वाहतुकीची अपेक्षा आहे. (हेही वाचा: येत्या 5 दिवसामध्ये राज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्र घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता)
हा मार्ग भिवंडीशी जोडला गेल्यावर वाहनांची संख्या दिवसाला एक लाखाच्या पुढे जाईल. जेव्हा मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग सुरू झाला तेव्हा दररोज 15,000 वाहनांची वाहतूक होत होती, जी सध्या 1.25 लाख आहे. दरम्यान, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग 701 किमी लांबीचा आहे, तर महामार्गाची रुंदी 120 मीटर आहे. महामार्गावर आठ लेनचे काम सुरू आहे. समृद्धी महामार्ग राज्यातील 10 जिल्हे, 26 तालुके आणि 392 गावांमधून जाणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर 24 जिल्हे एकमेकांशी जोडले जातील. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नागपूर ते मुंबई हा प्रवास अवघ्या 8-9 तासांत पूर्ण करता येणार आहे.