मुंबई पोलीस (Mumbai Police) दलातील बडतर्फ माजी अधिकारी सचिन वाझे ( Sachin Vaze) याला सामाजिक कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते स्टॅन स्वामी (Stan Swamy) यांची एनआयए कोर्टात आठवण झाली आहे. मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या अँटिलिया (Antilia) बंगल्यासमोर जिलेटीनच्या कांड्या भरलेले वाहन उभे केल्या प्रकरणी सचिन वाझे याला एनआयएनं (NIA) ताब्यात घेतले आहे. सध्या त्याला न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. हृदयविकाराचा त्रास असल्याने आपल्याला खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी एका याचिकेद्वारे वाझे याने एनआयए कोर्टात केली होती. या वेळी कोर्टाने त्याला खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी दिली.
सुनावणीदरम्यान, सचिन वाझे याने कोर्टात सांगितले की, 'मला स्टॅन स्वामी यांच्याप्रमाणे मरायचे नाही.' वाझे याचे म्हणे कोर्टाने ऐकून घेतले. त्यानंतर एनआयए कोर्टाने त्याला खासगी रुग्णालयात उपचार घेण्यास परवानगी दिली आहे. सचिन वाझे सध्या तळोजा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. एनआयएने सचिन वाझे आणि सुनील माने यांची कोठडी मागीतली होती. जी न्यायालयाने फेटाळून लावली आहे. (हेही वाचा, Sachin Vaze Dismissed: सचिन वाझे बडतर्फ; मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांचे आदेश)
सचिन वाझे याला एनआयएने ज्या प्रकरणात ताब्यात घेतले आहे ते प्रकरण भलतेच गुंतागुंतीचे ठरले आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्यासमोर जिलेटीनच्या कांड्या भरलेले वाहन 25 फेब्रुवारी या दिवशी उभे करण्यात आले होते. हे वाहन मनसूख हिरेन नामक व्यक्तीचे होते. दरम्यान, याच मनसूख हिरेन यांचा मृतदेह कळवा येथील खाडीमध्ये 5 मार्च रोजी सापडला. त्यावरुन अनेक प्रश्न, तर्क वितर्क व्यक्त करण्यात आले. अखेर न्यायालयीन आदेशानुसार मनसूख हिरेन यांचा मृतदेह एनआयएकडे सोपविण्यात आला. या प्रकरणातच वाझे याला अटक झाली आहे.
दरम्यान, अँटीलियाबाहेर स्फोटके ठेवणे आणि मनसूख हिरेन यांची हत्याअशा दोन्ही प्रकरणांचा तपास दहशतवाद विरोध पथक करत होते. मात्र, न्यायालयाच्या आदेशानंतर या दोन्ही प्रकरणांचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आला.