मागील आठवड्यात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना कॅलक्युलेशन समजत नसल्याची टीका केली होती. त्यानंतर रोहित पवार यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांनी रोहित पवार यांना नॉलेज नसल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे रोहित पवार यांनी शिंदे यांना फेसबुक पोस्टवरून प्रत्युत्तर देत केंद्र सरकारवर आरोग्याच्या प्रश्नावर निशाणा साधला आहे.
रोहित पवार यांनी फेसबूकवर पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'आरोग्याचा वाढता खर्च भागवताना राज्याच्या तिजोरीवर प्रचंड ताण येतोय, अशातचं आज सकाळी वृत्तपत्रात एक बातमी वाचायला मिळाली ती म्हणजे 'आरटीपीसीआर टेस्ट किट', पीपीई किट आणि N- 95 मास्क याचा राज्यांना करण्यात येणारा पुरवठा थांबवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. हा निर्णय म्हणजे आधीच अडचणीत असलेल्या राज्यांची आणखी कोंडी करण्याचा प्रकार आहे. ही कोरोना प्रतिबंधक साधने आजपर्यंत केंद्र सरकारकडून राज्यांना पुरवण्यात येत होती. खरेदी मोठ्या प्रमाणात होत असल्याने ही साधने केंद्राला कमी किंमतीतही मिळू शकतात. पण एकीकडं पेशंटची संख्या वाढत असताना या साधनांचा पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला, हे चुकीचं असल्याचंही रोहित पवार यांनी सांगितलं आहे. (हेही वाचा - Coronavirus Update: महाराष्ट्र पोलिस दलात एकाच दिवसात 341 नवे कोरोना रुग्ण, 2 मृत्यु, पहा आजवरची आकडेवारी)
The #Coronavirus Pandemic has brought with it severe challenges for #healthcare. We are rapidly falling behind in key health metrics like immunization & basic healthcare. Central & state govt. must come together to mitigate this.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 31, 2020
सर्वच राज्ये आज संकटात आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने राज्यांना त्यांचे हक्काचे #GST चे पैसे देणं गरजेचं होतं. पण ते देण्याऐवजी केंद्र सरकारने कर्ज घ्यायला सांगितलं आणि आता तर कोरोना सुरक्षा साधनांचा पुरवठाही थांबवायचा निर्णय घेतला. याला जबाबदारी घेणं म्हणत नाहीत. माझी केंद्र सरकारला नम्र विनंती आहे की, त्यांनी या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
कोरोना व्हायरसमुळे आरोग्याच्या मूलभूत प्रश्नांबाबत सर्वत्र गंभीर आव्हाने निर्माण झाली आहेत. लसीकरण आणि मूलभूत आरोग्यसेवा याबाबतीत आपण मागे पडत आहोत. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारने एकत्रितपणे प्रयत्न करुन यातून मार्ग काढायला पाहिजे, असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.