राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षामध्ये अजित पवार यांनी बंड केल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी पायाला भिंगरी लावून महाराष्ट्र पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या सभांनाही मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतो आहे. मात्र, या प्रतिसादात महिलांचा वाटा तुलनेत कमी आहे. जो वाढविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले आहेत. या प्रयत्नाचा भाग म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एनसीपीमध्ये मोठ्या प्रमाणावर संघटनात्मक फेरबदल केले जात आहेत. मुंबईत पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
शरद पवार यांनी रोहिणी खडसे यांना नियुक्तीपत्र दिले. खडसे यांना राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या आहेत. या आधी त्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी अध्यक्षा राहिल्या आहेत. सध्या त्या विद्यमान संचालिका आहेत. जळगाव आणि महाराष्ट्रभरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विस्तार करण्यासाठी आपण जोमाने प्रयत्न करु असे त्यांनी नियुक्तीनंतर म्हटले आहे.
महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करण्याची जाबाबदारी दिल्याबद्दल खडसे यांनी अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार फौजिया खान यांचे आभार मानले.
दरम्यान, खडसे यांच्या नियुक्तीमुळे शरद पवार यांच्या कट्टर समर्थक विद्या चव्हाण नाराज असल्याची चर्चा होती. याबाबत विचारले असता तसे काहीही नाही. त्यांच्या उपस्थितीमध्येच आपणास हे पत्र देण्यात आले आहे. त्यांच्या आशीर्वाद आणि मार्गदर्शनाखालीच पुढील प्रवास करणार असल्याचे त्या म्हणाल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बंडानंतर शरद पवार यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्यासह अजित पवार यांच्यासोबत न जाता पाठिमागे राहिलेल्या अनेक नेत्यांना घेऊन पक्षबांधणीस सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातून त्यांना मोठा प्रतिसादही मिळताना दिसतो आहे. मात्र हाच प्रतिसाद निवडणुकीच्या रिंगणात मतदानात परावर्तीत होतो का? याबाबत अवघ्या महाराष्ट्राला उत्सुकता आहे.