Sharad Pawar From Kolhapur: ईडी, सीबीआय आणि तशाच काही केंद्रीय संस्थांमार्फत नोटीस पाठायची आणि घाबरविण्याचा प्रकार सुरु आहे. ईडीची नोटीस आम्हालाही आली. आम्ही म्हणालो उद्या कशाला बोलवता आताच येतो. आम्ही घाबरलो नाही. नवाब मलिक, अनिल देशमुख, संजय राऊत यांच्यासारखे अनेक नेते तरुंगात गेले. पण घाबरले नाहीत. काहींनी मात्र भूमिका बदलली. त्यांच्या घरातील भगिनींनी दाखवले ते धाडस अनेकांना कुटुंबप्रमुख म्हणून दाखवता आले नाही, असा घणाघात शरद पवार यांनी केला आहे. ते कोल्हापूर येथील दसरा चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाद्वारे आयोजित सभेत बोलत होते. आपल्या भाषणात त्यांनी मंत्री यांचा नामोल्लेख न करता जोरदार टोला लगावला.
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड केले. त्यानंतर त्यांनी नऊ आमदारांसह भाजपसोबत हातमिळवणी करत एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात प्रवेश केल्यानंतर शरद पवार यांची कोल्हापूरात होणारी ही पहिलीच सभा होती. या सभेत त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका केली. या टिकेला हसन मुश्रीफ यांच्या घरावर पडलेल्या ईडीच्या धाडी आणि या धाडीवेळी मुश्रीफ कुटुंबातील महिलांनी प्रसारमाद्यमांसमोर व्यक्त केलेल्या उद्निग्न टीकेची किनार होती. या ईडीच्या धाडीवेळी मुश्रीफ कुटुंबातील महिलांनी असा त्रास देण्याऐवजी आम्हाला गोळ्या घालून ठार मारा. त्याला आमची तयारी असल्याचे म्हटले होते. हाच धाका पकडत कुटुंबातील भगिनींनी हे धाडस दाखवले. मात्र, कुटुंबप्रमुख म्हणून काहींना ही तयारी, धाडस दर्शवता आले नाही, असे पवार म्हणाले.
उल्लेखनीय असे की, शरद पवार यांच्या सभेला छत्रपती शाहू महाराज उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे आगामी काळात कोल्हापूरातून शाहू महाराजांना शरद पवार यांच्या पक्षाकडून उमेदवारी मिळण्याच्या चर्चेला बळकटी मिळाली आहे. या वेळी पवार यांनी आपणही सत्तेत होतो. मात्र, त्या वेळी कांद्यावर टॅक्स कधीच लावला नसल्याची आठवण त्यांनी सांगितले. याशिाय शेतमाल, मणिपूर, बेरोजगारी, बेकारी अशा विविध मुद्यांवरुनही केंद्रावर टीकेचा प्रहार केला.