Robbery In Kalyan: कल्याण पूर्वेत भरदिवसा ज्वेलर्सच्या दुकानात दरोडा; 30 तोळे सोन्यासह दीड लाखांची रोकड लंपास
Robbery (PC - pixabay)

Robbery In Kalyan: कल्याणमध्ये भरदिवसा ज्वेलर्सच्या दुकानात दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चोरट्यांनी दुकान मालकाला धारधार शस्त्राने धाक दाखवला. तसेच दुकानातील कर्मचाऱ्यांना मारहाण केली. मात्र, यातील एका कर्मचाऱ्याने एका चोरट्याला पकडलं. परंतु, यातील दोन चोरट्यांनी दुकानातील 30 तोळे सोने आणि दीड लाखांची रोकड लंपास करत दुकानातून पळ काढला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. कर्मचाऱ्याने पकडलेल्या चोरट्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. आज दुपारी घडलेला हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या चोरट्यांकडे बंदूक होती, असंही दुकान मालकाने सांगितलं आहे. पोलिस या दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.

प्राप्त माहितीनुसार, कल्याण पूर्वेमधील नांदीवली परिसरात वैष्णवी ज्वेलर्स नावाचं दुकान आहे. या दुकानात आज साडेतीन वाजेच्या सुमारास तीन चोरट्यांनी धारदार शस्त्राने धाक दाखवत दुकानातील ऐवज चोरी केले. यावेळी दरोडेखोरांनी दुकानातील 30 तोळे दागिने आणि 1 लाख 60 हजारांची रोकड लंपास केली. (हेही वाचा - Mumbai: गुंगीचं औषध देऊन 22 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार; तीन जणांवर गुन्हा दाखल)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुकानातील रुपाराम चौधरी या कर्मचाऱ्याने जखमी अवस्थेत एका चोरट्याला पकडले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. परंतु, यातील दोन चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.

दरम्यान, दुकानदारांनी या चोरट्याला पोलिसांच्या हवाली केलं. पोलिसांनी या प्रकरणी तिघा चोरट्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिस फरार झालेल्या आरोपींचा शोध घेत आहेत. दिवसाढवळ्या दुकानावर दरोडा पडल्याने संपूर्ण कल्याण शहरात भीतीचं वातावरण पसरल आहे.