
गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आल्यानंतर अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांच्या कंपनीने तातडीने खुलासा केला आहे. लातूर येथील देश अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व्यवस्थापनाकडून हा खुलासा आला आहे. देश अॅग्रोचे आस्थापना व्यवस्थापक दिनेश केसरे यांनी प्रसारमाध्यमांकडे खुलासा करताना विनंती केली आहे की, लातूर येथील नियोजित देश अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड या संदर्भात वृत्तवाहिनीवरील वृत्त चुकीच्या माहितीवर आधारित आहे. कंपनीचे प्रवर्तक रितेश आणि जिनिलिया देशमुख यांच्याबाबत गैरसमज निर्माण होऊ नये. तसेच, अपूऱ्या माहितीवर दिशाभूल होईल असे वृत्तही प्रसारीत करु नये असे केसरे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या कंपनीबाबत भाजपकडून गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले होते. या आरोपांमध्ये म्हटले होते की, रितेश आणि जिनिलिया यांच्या कंपनीसाठी लातूर एमआयडीसीत (Latur MIDC) भूखंड अवघ्या 10 दिवसांमध्ये मंजूर करण्यात आला आहे. देश अॅग्रो प्रा. लिमिटेड नावाच्या या कंपनीला अवघ्या महिन्याभरात चक्क 120 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले. शिवाय लातूर एमआयडीसी परिसरात जवळपास 16 उद्योजकांची प्रतिक्षा यादी 2019 पासून प्रलंबीत असतानाही त्यांना डावलण्यात आले. त्याउलट रितेश आणि जिनिलिया यांना तातडीने भूखंड देण्यात आला, असा आरोप लातूर भाजप जिल्हाध्यांनी पत्रकार परिषद घेत केला आहे.
रितेश हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचा मुलगा आणि काँग्रेस नेते अमित देशमुख यांचा भाऊ आहेत. ज्या कार्यकाळात भूखंड वाटप झाले त्या वेळी महाराष्ट्र विकास आघाडी सरकार सत्तेत होते. या सरकारमध्ये अमित देशमुख हे मंत्री होते. तसेच अमित हे लातूर जिल्ह्याचे पालकमंत्रीही होते.