राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील पात्र शिधापत्रिकाधारकाने नियमित स्वस्त धान्य खरेदी केल्यानंतर 1 किलो चणाडाळ किंवा तूरदाळ मोफत मिळणार आहे. यासाठी केंद्र शासनाकडून राज्याला प्रति महिना 16 हजार मेट्रिक टन डाळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासंदर्भात राज्याचे अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी माहिती दिली आहे.
पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत एप्रिल ते जून या 3 महिन्यांसाठी नियमित धान्यासोबतच प्रति महिना प्रति कार्ड 1 किलो चणाडाळ किंवा तूरदाळ मोफत वाटप केली जाणार आहे. या योजनेचा लाभ 7 कोटी लाभार्थ्यांना मिळणार असल्याचंही छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना या काळात रेशन कार्डवर धान्यांचे वाटप करण्यात येत आहे. अशातचं आता 3 महिन्यासाठी शिधापत्रिकाधारकाला प्रति महिना 1 किलो चणाडाळ किंवा तूरदाळीचे वाटप करण्यात येणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. (हेही वाचा - COVID19: मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहातील 81 कैद्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह)
पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत एप्रिल ते जून या तीन महिन्यांसाठी नियमित धान्यासोबतच प्रति महिना प्रति कार्ड १ किलो चणाडाळ किंवा तूरदाळ मोफत वाटप केली जाणार. या योजनेचा लाभ ७ कोटी लाभार्थ्यांना मिळणार- अन्न,नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री @ChhaganCBhujbal यांची माहिती pic.twitter.com/JxuNA2WfAt
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 10, 2020
दरम्यान, रविवारी केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत भरड धान्य खरेदी योजनेअंतर्गत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने महाराष्ट्रात मका व ज्वारी खरेदीचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात छगन भुजबळ यांनी माहिती दिली आहे. महाराष्ट्रात मका व ज्वारी खरेदीसाठी परवानगी देण्यात आल्यामुळे राज्यातील मका व ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.