लोकसभा निवडणूकांच्या निकालांचे पडघम वाजताच पुन्हा एकदा महागाईने डोकं वर काढलं आहे. कडधान्यांच्या किंमतीत कमालीची वाढ झाली असून तूरडाळीचा भाव प्रतिकिलो 100 रुपये दराने वाढल्याने आता ग्राहकांच्या खिशाला आता कात्री बसणार आहे. मागील दोन महिन्यांत डाळीच्या दरात प्रतिकिलो ३६ रुपयांनी वाढ झाली आहे. मसूर, मूग आणि मटकी या कडधान्याबरोबर, शेंगदाणा, वरीच्या दरातही वाढ झाल्याने महागाईचे चटके जाणवू लागले आहेत.
महाराष्ट्रात दुष्काळाने आणि काही भागातील अवकाळी पावसाचा फटका पिकांना बसलाय. त्यामुळे धान्य आणि कडधान्यांचे उत्पादन देखील कमी झाले आहे. तूरडाळीच्या दरात प्रतिकिलो आठ रुपये वाढ झाली असून १०० रुपये दर झाला आहे. २०१५ मध्ये दुष्काळ पडल्याने तुरीचे उत्पन्न घटले होते. त्यावर्षी तुरडाळीचे दर गगनाला भिडले होते. प्रतिकिलो २२० रुपयांनी तूरडाळीची विक्री झाली. गरीबांसाठी सरकारला रेशनवर प्रतिकिलो १०० रुपयांने तूरडाळ विक्री करावी लागली. त्यावेळी केंद्र सरकारने डाळीचे उत्पादन घेण्याचे आवाहन केले.
गेल्या दोन महिन्यांत तूरडाळीचा दर ६४ रुपयांवरुन १०० रुपयांवर पोहोचला आहे. मागील आठवड्यात हा दर प्रतिकिलो ९२ रुपये होता. मसूरडाळ आणि मूगाच्या दरात प्रतिकिलो चार रुपयांनी वाढ झाली आहे. मटकीच्या दरात प्रतिकिलो दहा रुपयांनी वाढ झाली आहे. बंदरी मटकी ७० रुपयांवरुन प्रतिकिलो ८० रुपये तर जवारी मटकीच्या दर ११० रुपयांवरुन १२० रुपये झाला आहे.
हरभरा आणि उडीद डाळ महागणार, सर्वसामन्यांना फटका
शेंगदाण्याच्या दरात प्रतिकिलो दहा रुपयांनी वाढ झाली आहे. भूईमुगच्या पेरणीसाठी शेंगदाण्याची मागणी वाढल्याने दर वाढले आहेत. वरीच्या दरातही चार रुपयांनी वाढ झाली असून प्रतिकिलो ८८ रुपयांवर ९२ रुपयांवर दर पोहोचला आहे. महागाईचा हा वाढता दर लक्षात घेता गृहिणींचे महिन्याचे बजेट कोलमडणार असेच एकंदरीत परिस्थितीवरुन पाहायला मिळतय.