Ramdas Kadam: 'मंत्री अनिल परब यांच्याशी माझे जवळचे संबंध' व्हायरल ऑडिओ क्लिपवर रामदास कदम यांची प्रतिक्रिया
Anil Parab, Ramdas Kadam (Photo Credit: Facebook)

शिवसेनेचे (Shiv Sena) पहिल्या फळीतील नेते आणि माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्या कथित ऑडिओ क्लिपने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. दरम्यान, रामदास कदम यांनीच विद्यमान मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या दापोली तालुक्यातील मुरुड येथील रिसॉर्टची माहिती भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना पुरवली आहे, असा आरोप मनसेचे राज्य सरचिटणीस आणि खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. यावर रामदास कदम यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच मंत्री अनिल परब यांच्याशी माझे जवळचे संबंध असून या व्हायरल क्लिप बनावट असल्याचे रामदार कदम यांनी म्हटले आहे.

रामदास कदम म्हणाले की, "माझ्यावर केलेले सर्व आरोप खोटे असून त्या ऑडिओ क्लिप बनावट आहेत. अनिल परब हे माझे जवळचे मित्र असून किरीट सोमय्या यांना गेल्या पंधरा वर्षात मी एकदाही भेटलो नाही. माझ्यावर आरोप करणाऱ्या दोघांनी कधीकाळी माझ्या हाताखाली काम केले आहे. ते शिवसेनेशी गद्दारी करून दुसऱ्या पक्षात गेले आहेत. संजय कदम यांचा माझ्या मुलाने पराभव केला आहे. तर, वैभव खेडेकर यांची अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे मी उघड केली आहेत. यामुळे हे दोघेही माझ्याविरोधात कुरघोड्या करीत आहेत. त्यानी गेल्या तीन महिन्यात माझ्याविरोधात अनेक पत्रकार परिषद घेतल्या आहेत. या दोघांवर मी अब्रु नुकसानीचा दावा टाकला आहे," असे रामदास कदम यांनी म्हटले आहे. हे देखील वाचा- Kishori Pednekar On Fake Clean-up Marshal: अवैध वसुली करणार्‍या क्लिनअप मार्शल वर बीएमसीचा कारवाईच्या तयारीत; कंत्राटदार ब्लॅकलिस्ट होणार, फौजदारी गुन्हा दाखल करणार - महापौर किशोरी पेडणेकर

रामदास कदम यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर शिवेसनेत एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणी रामदास कदम यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. ही ऑडिओक्लिप खोटी असून याप्रकरणी आपण मुंबई उच्च न्यायालयात अब्रु नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे कदम यांनी म्हटले आहे.