Kishori Pednekar On Fake Clean-up Marshal: अवैध वसुली करणार्‍या  क्लिनअप मार्शल वर बीएमसीचा कारवाईच्या तयारीत; कंत्राटदार ब्लॅकलिस्ट होणार, फौजदारी गुन्हा दाखल करणार - महापौर किशोरी पेडणेकर
Mayor Kishori Pednekar (Photo Credits-ANI)

मुंबईमध्ये (Mumbai) कोरोना नियमावलीचं पालन काटेकोरपणे व्हावं म्हणून बीएमसीने (BMC) क्लिनअप मार्शल (Fake Clean-Up Marshal) तैनात केले आहेत. मात्र मागील काही दिवसांत ठिकठिकाणी मार्शल्स आणि सामान्य नागरिकांमध्ये हमरीतुमरीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. काही बोगस टोळ्या क्लिनअप मार्शल म्हणून काम करत असल्याची, अवैधरित्या वसुली करत असल्याचं काही वृत्तवाहिन्यांच्या स्टिंग ऑपरेशन मध्ये समोर आलं आहे. दरम्यान पालिकेने आता या गोष्टीची दखल घेत त्यांच्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत.

आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकारांशी बोलताना नागरिकांनी तोंडावर नीट मास्क लावावा असं आवाहन करत बोगस क्लिनअप मार्शलवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी स्टिंग ऑपरेशनची दखल घेतली आहे. सोमवारी याबाबत पालिकेत एक बैठक होणार असून दोषी कंत्राटदारांना ब्लॅक लिस्ट केले जाईल. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होईल असं म्हटलं आहे. तसेच मुलाखती घेऊनच यापुढे क्लिनअप मार्शल नेमले जातील असं त्यांनी सांगितलं आहे. नक्की वाचा: BMC Cleanup Marshal Viral Video: मुंबईच्या सांताक्रुझ भागात मास्क न घातलेल्या प्रवाशाकडून दंड वसूलीसाठी मार्शल चालत्या कारच्या बोनेटला बिलगला; व्हिडिओ वायरल.

दरम्यान काही वृत्तवाहिन्यांच्या स्टिंग ऑपरेशन मध्ये काही ठिकाणी क्लिनअप मार्शल दंडाच्या 200 रूपयाऐवजी परस्पर 100 रूपये घेऊन ते त्यांच्याच खिशात ठेवत त्याची पावती न देता नियम मोडणार्‍यांसोबत मांडवली करत असल्याचं पहायला मिळत आहे. काहींनी त्यांना पगार नसून कमिशन वर पैसे अवलंबून असल्याची बाब सांगितली आहे.  मागील काही दिवसांत क्लिनअप मार्शल्स सोबत हाणामारीचे, त्यांना गाडीवरून फरफटत घेऊन जाण्याचे अनेक प्रकार सोशल मीडीयात समोर आले आहेत.