Ramdas Athawale | (Photo Credits: X/ANI)

लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) चे वारे वाहू लागले आहे. इंडिया आघाडी आणि एनडीए यांच्यात मोर्चेबांधणीला सुरुवात झाली असून त्याचे पडसाद महाराष्ट्रातही दिसत आहेत. एकेक मतदारसंघ घेऊन आखणी केली जात आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केलेल्या एका दाव्यामुळे अकोला लोकसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे. या मतदारसंघावरुन प्रश्न विचारला असता उत्तरादाखल बोलताना केंद्रीय मंत्री म्हणाले हा मतदारसंघ आम्ही अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यासाठी सोडला आहे. त्यांच्या या विधानामुळे उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.

तर आम्हीही त्यांना पाठिंबा देऊ

अॅड. प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देणार का? असे विचारले असता आठवले म्हणाले. जर त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. या वेळी बोलताना रामदास आठवले यांनी महाविकासआघाडीला टोला लगावत म्हटले आहे की, आंबेडकर यांनी लोकसभेसाठी दिलेला 12-12-12 फॉर्म्युला महाविकासआघाडीने स्वीकारायला हवा. म्हणजे मग आम्हाला त्यांचे बारा वाजविण्यात यश येईल. (हेही वाचा, Ramdas Athawale लोकसभा लढविण्याची इच्छा, दोन मतदारसंघावर डोळा)

काँग्रेससोबत युती आणि आंबेडकरांचा विजय

अकोला मतदारसंघ नेहमीच चर्चेला असतो. या मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर मैदानात उतरत असतात. लोकसभा निवडणुक 1998 आणि 1999 मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी या ठिकाणी विजय मिळवला होता. अर्थात त्या वेळी त्यांची काँग्रेस पक्षासोबत युती होती. दरम्यान, पुढे त्यांनी वंचित बहुजन आघाडी स्थापन केली. ही आघाडी काँग्रेसच्या मतदारांना बऱ्यापैकी आपल्याकडे खेचण्यात यशस्वी झाली आहे. अशा वेळी आता लोकसभा निवडणुकी आंबेडकर यांना महाविकासआघाडी सोबत घेणार का? याबाबत उत्सुकता आहे. (हेही वाचा, Prakash Ambedkar In I-N-D-I-A: प्रकाश आंबेडकर 'इंडिया' आघाडीत? शरद पवार काय म्हणाले? घ्या जाणून)

महाविकासाघडी विंचितसाठी अनुकुल

अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी महाविकासआघाडीला आपला फॉर्म्युला दिला आहे. सुरुवातील वंचित आघाडीला टाळणारा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना आता स्वीकारणार असल्याचे प्रसारमाध्यमांसमोर तरी बोलतो आहे. औपचारिक घोषणा किंवा बोलणी झाल्याची माहिती नसली तरी शरद पवार, अशोक चव्हाण यांसारख्या नेत्यांनी अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत सकारात्मक विधाने केली आहेत. त्यामुळे आगामी काळात वंचितचा प्रवेश महाविकासआघाडीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अकोला लोकसभा मतदारसंघावर सध्या भाजपचे वर्चस्व आहे. या ठिकाणी संजय धोत्रे हे लोकसभेवर प्रतिनिधित्व करतात. सध्या ते प्रकृती अस्वास्थ्याने त्रस्त आहेत. त्यामुळे या वेळी या ठिकाणाहून भाजप कोणाला मैदानात उतवणार याबाबतही अद्याप स्पष्टता नाही. त्यामुळ सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंनी सध्या कोरी पाटी पाहायला मिळते आहे.