Ramdas Athawale Meets Kangana Ranaut: केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली कंगना रनौतची भेट; RPI चा कंगनाला पूर्ण पाठींबा असल्याचे केले स्पष्ट (Watch Video)
Ramdas Athawale Meets Kangana Ranaut (Photo Credit : Twitter)

कंगना रनौत (Kangana Ranaut) आणि महाराष्ट्र सरकार यांच्या वादाने आता एक वेगळेच वळण घेतले आहे. बीएमसी (BMC) कडून कंगनाच्या कार्यालयावर झालेल्या कारवाईविरोधात आता विरोधी पक्ष एकवटले आहेत. आज केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी कंगना रनौतची भेट घेत आहे. आठवले आज संध्याकाळी कंगनाला भेटण्यासाठी तिच्या निवास्थानी पोहोचले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन घडलेल्या चर्चेबाबत माहिती दिली. याधीही रामदास आठवले व त्यांच्या पक्षाने वेळोवेळी कंगणाचे समर्थन केले आहे. कंगना मुंबईत आली त्यावेळी, तिच्या संरक्षणासाठी रिपब्लिकन पक्षाचे (RPI) कार्यकर्ते मुंबई विमानतळावर सज्ज राहिले होते.

यावेळी बोलताना कंगनासोबत झालेल्या चर्चेतील काही गोष्टी त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितल्या. ते म्हणाले, ‘बीएमसीने कंगनाच्या कार्यालयावर केलेली कारवाई चुकीची आहे. बीएमसीने सांगितल्याप्रमाणे याआधी 2018 त्यांनी कंगनाला नोटीस पाठवली होती. मात्र हे प्रकरण दंड भरून घेऊन मिटवता आले असते मात्र तिच्या बाबतच्या सूडभावनेने बीएमसीने ही कारवाई केली. बीएमसीने अनधिकृत बांधकामासोबतच कंगनाच्या कार्यालयामधील फर्निचरचे नुकसान केले, ते पूर्णतः चुकीचे होते. याप्रकरणी आपण कोर्टात जाणार असल्याचे कंगनाने सांगितले, तसेच तिला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे असेही तिचे म्हणणे आहे.’

यासोबत पुढे ते म्हणाले, ‘कंगणाने मुंबई बद्दल केलेल्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. पण ती एक महिला आहे तिच्याबद्दल अशी भाषा वापरणे चुकीचे आहे. महिला म्हणून तिला संरक्षण देणे आमची नैतिक जबाबदारी आहे. शिवसेना आणि अनेक पार्टीची कार्यालये अवैध आहेत, 52 हजार कामे मुंबईत अवैध आहेत, ती तुम्ही तोडणार आहात का?’ असा सवालही आठवलेंनी विचारला आहे.

एएनआय ट्वीट -

नंतर ते म्हणाले, ‘कंगनाला मुंबईत घाबरण्याची काही गरज नाही, कंगनाच्या पाठीशी आरपीआय असणार आहे. आपण मुंबईकरच असल्याचेही कंगनाने मला सांगितले आहे.’ अशाप्रकारे आपला कंगना पूर्ण पाठींबा असल्याचे रामदास आठवले यांनी स्पष्ट केले आहे. यासोबत, कंगनाचे आरपीआयमध्ये 100 टक्के स्वागत करेन, तर भाजपमध्ये आल्यास 50 टक्के स्वागत करेन, असेही रामदास आठवले म्हणाले. (हेही वाचा: कंगना रनौतच्या कार्यालयावर महानगरपालिका कारवाई करत आहे, त्याचा शिवसेनेशी काही संबंध नाही - संजय राऊत)

दरम्यान, या कारवाईयाविरोधात आता कंगनाने हायकोर्टात धाव घेतली आहे. कोर्टाने सध्या बीएमसी ला ही कारवाई थांबवण्याचे आदेश दिले असून, आता कंगनाच्या याचिकेवर 22 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. अल्पावधीची नोटीस देत कारवाई करणे पक्षपाती आणि चुकीचे असल्याचा कंगनाने म्हटले आहे.