राजू शेट्टी (Photo Credit : Facebook)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शेतकऱ्यांचे सप्टेंबर 2019 पर्यंतचे 2 लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. ही कर्जमाफी 'महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने'अंतर्गत मार्च 2020 पासून लागू होणार आहे. परंतु, या कर्जमाफी योजनेत अनेक अटींचा समावेश आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ घेता येणार नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी या कर्जमाफी योजनेवर नाराजी व्यक्त केली आहे.

ठाकरे सरकारचा कर्जमाफीचा निर्णय हा घाईगडबडीत घेतलेला निर्णय आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही. सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणीही राजू शेट्टी यांनी केली आहे. तसेच या सरकारने शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही, असा आरोपही राजू शेट्टी यांनी केला आहे. (हेही वाचा - महाविकास आघाडीकडून शेतकऱ्यांची फसवणूक सुरु आहे- चंद्रकांत पाटील)

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी केली. तेव्हा ठाकरे यांनी शेतकऱ्यांना मी तुम्हाला पूर्णपणे चिंतामुक्त आणि कर्जमुक्त करतो, असं आश्वासन दिलं होतं. मात्र, ठाकरे यांनी दिलेलं हे आश्वासन या कर्जमाफी योजनेत पूर्ण होत नाही. सरकारने हा निर्णय अत्यंत घाईगडबडीत घेतला आहे. सरकारने यावर पुनर्विचार करावा, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.

हेही वाचा - कर्जाने हैराण झालेला शेतकरी अखेर अंत्यसंस्काराचं साहित्य घेऊन पोहोचला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला

भाजपने केलेली कर्जमाफीही असमाधानी होती, असंही राजू शेट्टी यांनी सांगितले. ठाकरे सरकारने कर्जमाफी योजना जाहीर करताना कोणतीही अट नसल्याचे म्हटले होते. परंतु, ही कर्जमाफी फसवी असल्याचे आरोप होताना दिसत आहे.