महाविकास आघाडीकडून शेतकऱ्यांची फसवणूक सुरु आहे- चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील (Photo credit : facebook)

महाराष्ट्रातील (Maharashtra) शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thakeray) यांनी रविवारी विधानसभेत केली होती. ही कर्जमाफी सरसकट असणार असून कोणत्याही अटी शर्थी लागू नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. मात्र, यावर भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Paitl) यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. महाविकास आघाडीच्या सरकारने राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे थकीत कर्ज माफ करु असे सागितले असताना 2 लाख रुपयांचा निकष का? तसेच महाराष्ट्रातील सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचेही ते म्हणाले आहेत.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून विरोधीपक्षातील नेते सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. यातच चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री यांच्यावर निशाणा साधला आहे. जर महाविकास आघाडीने सत्तेत आल्यानंतर सर्व शेतकऱ्यांचे थकीत कर्ज माफ करु असे, अश्वासन दिले होते. मग 2 लाखांचा निकष का? भाजपच्या सरकारने आधीच 6 हजार 800 कोटींचे कर्ज माफ केले होते. एवढेच नव्हे तर, पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांनाही मदत केली आहे. महत्वाचे म्हणजे, जे शेतकरी नियमितपणे कर्ज भरतात त्यांना याचा काय फायदा होणार, असे चंद्रकांत पाटील यांनी अखील भारतीय विद्यार्थी अधिवेशनला जात असताना विधान केले आहे. हे देखील वाचा-मुंबई: CAA समर्थनार्थ आयोजित 'संविधान सन्मान मार्च' ला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये ठाकरे सरकारने चलाखी केल्याचे समोर आले आहे. दोन लाखांपेक्षा एक रुपयाही अधिकचे थकित कर्ज असेल, तर शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार नसल्याचे सरकारच्या अध्यादेशात उघड झाले आहे. अल्पमुदतीच्या कर्जासाठीच ही कर्जमाफी योजना लागू होणार आहे.