Rajiv Satav Passes Away: काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे निधन; Randeep Singh Surjewala यांनी ट्विटद्वारे शेअर केली दु:खद बातमी
Rajeev Satav (Photo Credits: Twitter)

काँग्रेस खासदार (Congress MP) राजीव सातव (Rajiv Satav) यांचे निधन झाले आहे. ते 46 वर्षांचे होते. कोरोनावर मात केल्यानंतर त्यांना न्युमोनियाचं निदान झालं होतं. त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. यानंतर राजकीय वर्तुळातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. दरम्यान, त्यांच्या शरीरात सायटोमॅजिलो व्हायरस (Cytomegalovirus) आढळून आला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली  होती. (काँग्रेस नेते राजीव सातव यांची प्रकृती खालावली, न्युमोनियाचा संसर्ग झाल्याने व्हेंटिलेटरवर)

सातव हे एआयसीसीचे सदस्य असून विदर्भ आणि मराठवाडा विभागातील एक प्रमुख नेते होते. 22 एप्रिल 2021 रोजी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना पुण्यातील जहांगीर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कालांतराने त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते.

Randeep Singh Surjewala Tweet:

काँग्रेस नेते आणि हरियाणाचे माजी खासदार रणदीप सिंह सुरजेवाला यांनी सातव यांच्या निधनाची माहिती ट्विटद्वारे देत शोक व्यक्त केला आहे. "सार्वजनिक जीवनात माझ्यासोबत एकत्र पाऊल टाकणारा माझा साथीदार आज मी गमावला आहे. राजीव सातव यांचे हास्य, मैत्री, नेतृत्व आणि पक्षाबद्दलची निष्ठा नेहमी लक्षात राहण्यासारखी आहे," अशा शब्दांत सुरजेवाला यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सातव हे 2014 मध्ये हिंगोली विधानसभा निवडणूकीमध्ये निवडून आले होते. या निवडणुकीत त्यांनी शिवसेना नेते सुभाष वानखेडे यांचा पराभव केला होता. राजीव सातव यांना 4 वेळा 'संसदरत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.